शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना साकडेएएमसी मिरर वेब टीम
मुंबई : राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. याच विषयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी २५ हजार रूपये मदत देण्याची मागणी विधानसभेत केली. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.
रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,”युती आघाडीतील सहकारी पक्ष बदलले आहेत. गेल्या पाच वर्षात आम्ही सत्तेत होतो. जनतेच्या काही मुद्यांवर आवाज उठवत होतो. मी जो आढावा मागितलेला आहे तो हाच आहे. संपूर्ण राज्यामध्ये विकासकामं किती आणि कोणती कुठे चालली आहेत. त्याच्यावरचा प्रस्तावित खर्च किती ती कधी पूर्ण होणार, ती अडली असतील तर का अडली याची माहिती हवी आहे. यांचा प्राधान्यक्रम मला लावायचा आहे. काही विकासकाम अशी असू शकतील ज्यांची तातडीनं आवश्यकता नाही, काही विकासकामं तातडीनं होणं आवश्यक आहे पण त्याच्याकडं दुर्लक्ष झालं आहे. म्हणून हा जो लेखाजोखा आहे. त्याची संपूर्ण माहिती मंत्रिमंडळासमोर आणण्याची सूचना केली आहे. त्यानंतर आपल्या सर्वांना कळेल की आपण नक्की कुठे आहोत,” अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं मदत करायला हवी. विरोधी पक्षातील नेत्यांनीही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी. राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आर्थिक साहाय्य करण्याची मागणी त्यांनी करावी,” असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉलही केला होता, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
“राज्यात जो अवकाळी पाऊस झाला. त्यात शेतकऱ्यांचं, मासेमारी करणाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यांना तात्काळ २५ हजार रूपये हेक्टरी मदत देण्यात यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः तशी मागणी केली होती. ती आता त्यांनी त्वरेने पूर्ण करावी आणि बळीराजाला दिलासा द्यावा,” अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विधानसभेत केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post