४५ वर्षांमधील सर्वात मोठी बेरोजगारी मोदींमुळे : राहुल गांधी


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रामलीला मैदानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला. यावेळी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर टीका केली. ४५ वर्षांमधील सर्वात मोठी बेरोजगारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आली, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच अर्थव्यवस्थेला मोठा झटका लागला आहे. काळ्या धनाविरोधात पंतप्रधान खोटं बोलले आहे. गेल्या ४५ वर्षांमधील सर्वाधिक बेरोजगारी ही मोदींमुळेच आली, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. पंतप्रधानांनी अर्थव्यवस्था नष्ट केली आहे. सामान्यांचे लाखो कोट्यवधी रूपये त्यांनी अदानी अंबानींना दिले. मोदींच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. भारताच्या सर्व शत्रूंना वाटायचं की भारताची अर्थवस्था नष्ट व्हावी. पण हे काम शत्रूंनी नाही तर पंतप्रधानांनी केलं. या देशात प्रामाणिक उद्योगपतीही आहेत. छोटे दुकानदार, प्रामाणिक उद्योगपती या देशाला घडवतात. गेल्या पाच वर्षांमध्ये मोदींनी अदानींना ५० कंत्राटं दिली. उद्योगपतींचं कोटी रूपयांचं त्यांनी कर्ज माफ केलं. लोकांकडून फोन वापरायला टेलिफोन बिल वाढवतात आणि मोठ्या लोकांचं कोट्यवधीचं कर्ज माफ करतात, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
जो पर्यंत युवकांकडे रोजगार नसेल शेतकरी सक्षम नसेल तोवर देशाची अर्थव्यवस्था पुढे जाणार नाही. कर जनतेकडून घेतला जातो मात्र कर्ज उद्योगपतींच माफ होतं. पंतप्रधानांनी देशाला विभागण्याचं काम केलं. जीडीपी ९ टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आणला. किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे विचारलं तर आम्हाला माहित नाही असं उत्तर देतात. शेतकरी आणि कामगारांशिवाय देशाचा विकास अशक्य आहे. मोदींनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायला हवी होती. पण देशाला कमकुवत करण्याचं, विभागण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे आज देशातील काही राज्य आजही जळतायत, असंही त्यांनी नमूद केलं. मोदी एकाच गोष्टीचा विचार करतात. हाती सतता आहे किंवा नाही. सत्तेसाठी ते काहीही करतील. ते केवळ आपल्या मार्केटिंगवर लक्ष देतात. ते कायम टिव्हीवर दिसतात. पण याचा पैसा कोण देतं याचा विचार कोणं करतं का ? असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला.


Post a Comment

Previous Post Next Post