देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांच्या भूमिकेवर टीका


एएमसी मिरर वेब टीम 
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एल्गार परिषदेप्रकरणी केलेल्या वक्तव्याचे आश्चर्य वाटलं असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ज्यांना अटक झाली त्यांची पार्श्वभूमी काय आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना सुधीर ढवळे, अरुण परेरा याना अटक करण्यात आली होती. तर मनमोहन सिंग सरकारने या बंदी घातलेल्या संघटनांची नावे संसदेत सांगितली होती. तेव्हा ते योग्य होते, मग आमच्या सरकारच्या काळात कारवाई झाल्यास लगेचच जातीयवादी कसे? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने देखील या व्यक्तींना जामीन नाकारला. फक्त कोरेगाव भीमाच नव्हे, तर अन्य अनेक प्रकरणात देखील अटक आरोपींचा हात असल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे सोयीची भूमिका शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याने घेणे योग्य नाही, अशा भूमिकेमुळे पोलिसांचा आत्मविश्वास कमी होईल असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. इतकंच नाही तर शरद पवारांचा पक्ष सत्तेत असताना. यादीत अर्बन नक्षल हा शब्द आला असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर येथील अधिवेशनाबाबत विचारले असता ते म्हणाले की, नव्या सरकारचे पाहिले अधिवेशन, त्यात लक्षवेधी, नवे मंत्री, खातेवाटप, प्रश्नांची उत्तरे असे काहीच नसल्याने अधिवेशनाची केवळ औपचारिकता पार पडली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, या नव्या सरकारमधील मंत्री मंडळ विस्ताराला एवढा वेळ का लागतो ते कळत नाही. असे सांगत महाविकास आघाडीवर त्यांनी निशाणा साधला.

हे सरकार किती काळ टिकेल या प्रश्नावर ते म्हणाले की, मी भविष्यकार नाही, पण अशा प्रकारचे सरकार कधीच कोणत्या राज्यात चाललेले नाहीत. हे सरकारही त्याला अपवाद ठरणार नाही. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, राज्यातील शेतकर्‍यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत केली जाईल अशी घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र एक नव्या पैशाची मदत, या सरकारने केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विश्वासघात करण्यास, या अधिवेशनामधून सुरुवात झाली असल्याचे सांगत शिवसेनेवर टीका केली.

सीएए आणि एनआरसीचे पडसाद राज्यात देखील उमटत आहे. त्यावर ते म्हणाले की, देशात सीएए आणि एनआरसी हा वाद शंभर टक्के राजकीय हेतूने प्रेरित केलेला असून अल्पसंख्याकांच्या माथी भडकविण्याचे प्रयत्न केले जात आहे. यामुळे कोणाचीही नागरिकता काढून घेतली जाणार नाही, तर दिली जाणार आहे. आपल्या देशातील अल्पसंख्यांकांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

अमृता फडणवीस कधी ही राजकारणात येणार नाही
अमृता फडणवीस या अनेक वेळा राजकीय भूमिका मांडतात तर त्या राजकारणात येणार का त्या प्रश्नावर म्हणाले की, अमृता फडणवीस वेगळे व्यक्तिमत्व असून त्यांचे निर्णय त्या स्वतः घेतात. त्या कधीही राजकारणात येणार नाही. पण अनेकदा अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात, ते देखील त्यांना भोगावेच लागते. अशी भूमिका त्यांनी मांडली.

पाच वर्षात मुलीला सिनेमा पाहण्यास आणि गार्डन मध्ये घेऊन गेलो नाही
मागील पाच वर्षात काय कमावलं आणि काय गमावलं या प्रश्नावर ते म्हणाले की, लोकांचे प्रचंड प्रेम आणि विश्वास पाच वर्षात मिळवला. पण वैयक्तिक जीवनात अनेक गोष्टी गमवाव्या लागल्या आहेत. गेल्या पाच वर्षात एकही दिवस सुटी घेतली नाही, मुलीला हॉटेल, सिनेमा आणि गार्डन मध्ये घेऊन गेलो नसल्याचे त्यांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post