मी कोअर कमिटीत होतो, काढलं असेल तर माहिती नाही : एकनाथ खडसे


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली. तब्बल दोन ते अडीच तास ही चर्चा सुरु होती. भेटीनंतर खडसे यांनी पत्रकारांना भेटीदरम्यान झालेल्या चर्चेची माहिती दिली. यावेळी त्यांनी अनेक खुलासे केले. मी कोअर कमिटीत होतो, मात्र सध्या कोअर कमिटीच्या बैठकांना आमंत्रण येत नाही. त्यामुळे कोअर कमिटीतून मला काढलं असेल, तर माहिती नाही, असं खडसे म्हणाले.
एकनाथ खडसे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याची चर्चा पंकजा मुंडे यांच्याशी करण्याची गरज नाही. माध्यमं सर्व दाखवत असतात. विनोद तावडेंना माझी मनधरणी करण्याची जबाबदारी दिली आहे की नाही याविषयी मला माहिती नाही. मात्र, मी आजही पक्षातच असल्याने मनधरणी करण्याची गरज नाही. मी पूर्वीही पक्षात होतो, पक्षाचं नेतृत्व केलं आहे. पण कुणाची मनधरणी करण्यासाठी कुणाची नेमणूक करावी, अशी प्रथा भाजपमध्ये याआधी तरी नव्हती. आता नव्यानं काही निर्माण झालं असेल, तर माहिती नाही.”

Post a Comment

Previous Post Next Post