१०० जन्म घेतले तरीही राहुल गांधींना ‘सावरकर’ होता येणार नाही : भाजपा


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : एक-दोन नाही १०० जन्म घेतले तरीही राहुल गांधी यांना वीर सावरकर होता येणार नाही. अशा शब्दात भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. “सावरकर हे वीर होते, देशभक्त होते, देशासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. राहुल गांधी यांना १०० जन्म घेऊनही सावरकर होता येणार नाही. अनुच्छेद ३७०, एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक याबाबत राहुल गांधी यांनी वापरलेली भाषा आणि पाकिस्तानची भाषा सारखीच आहे. असा माणूस हे कोणत्या तोंडाने म्हणतो की माझे आडनाव सावरकर नाही? राहुल गांधी यांना सावरकर याच जन्मात नाही तर पुढच्या १०० जन्मात होता येणार नाही” असं म्हणत भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘रेप इन इंडिया’ या आपल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, या भाजपाच्या मागणीवर राहुल गांधी यांनी भाष्य केलं. आज दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या देश बचाव रॅलीमध्ये “माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी कदापी माफी मागणार नाही,” अशा वादग्रस्त शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राहुल गांधी यांनी केलेल्या याच वक्तव्याचा भाजपाने तिखट शब्दांमध्ये समाचार घेतला आहे. राहुल गांधी यांनी १०० जन्म घेतले तरीही त्यांना सावरकर होता येणार नाही असं आता भाजपाने म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी रामलीला मैदानावरच्या देश बचाओ रॅलीत जी भूमिका घेतली आणि सावरकरांबाबत जे वक्तव्य केलं ते त्यांना चांगलंच भोवणार आहे असंच दिसतं आहे.


Post a Comment

Previous Post Next Post