‘मंत्री आहोत याचे भान ठेवा, उगाच पाण्याच्या टाकीवर चढू नका’


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : आपण भिन्न भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आलो असलो तरी आपल्याला जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्याबाबत आपण सगळे एक आहोत. एक कुटुंब म्हणून आपल्याला काम करायचे असून एखाद्या विषयावर वेगवेगळी भूमिका जरी असली तरी राज्यासाठी हिताचे काय याचाच विचार आपल्याला करायचा आहे याचे भान सर्वानीच ठेवू या, असा कानमंत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आपल्या सहकाऱ्यांना दिला. 
मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी पार पडल्यानंतर झालेल्या  पहिल्याच मंत्री परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकारी मंत्र्यांना कारभाराचा कानमंत्र दिला. या वेळी सरकारच्या कर्जमाफी योजनेवर झालेल्या चर्चेदरम्यान अनेक नवीन मंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या वेळी तुम्ही आता सरकारचा घटक आहात. सरकारने सर्व विचार करून योजना आणली असून नियमित कर्ज भरणारे तसेच दोन लाखांच्या वर कर्ज असलेल्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्याबाबतही योजना आणली जाईल, असे मुख्यमंत्र्यानी बैठकीत स्पष्ट केल्याचे समजते.
तर आपण आता मंत्री आहात याचे भान ठेवून वागा. उगाच कोणत्याही विषयावरून पाण्याच्या टाकीवर चढण्याचे आंदोलन करू नका. आता तुम्हाला कोणी खाली उतरवणार नाही. त्यामुळे कर्जमाफी तसेच सरकारचे अन्य निर्णय जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम करा, असा कानमंत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना दिला.

आम्ही जे करतो ते रोखठोक : मुख्यमंत्री
वाद घालणे व भिंती रंगवणे एवढेच काम आम्हाला नसून आम्ही जे करतो ते रोखठोक, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना फटकारले. मंत्री परिषदेच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्तारावर कोणी नाराज नसून सर्वानाच मर्यादा असतात. आपल्याकडे कोणाचीही नाराजी आलेली नसल्याचे सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल बोलताना, आम्ही जे करतो ते रोखठोक अशा शब्दांत त्यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. दरम्यान भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३४ मधील अनुसूचित जाती-जमातीच्या संदर्भातील राखीव जागांबाबत अनुसमर्थन करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन ८ जानेवारी रोजी बोलवावे, असेही मंत्री परिषदेच्या बैठकीत ठरले.

Post a Comment

Previous Post Next Post