नागपूरमध्ये 5 वर्षीय चिमुकलीची दगडाने ठेचून हत्या


एएमसी मिरर वेब टीम 
नागपूर : हैदराबाद बलात्कार प्रकरणाच्या विदारक आठवणी ताज्या असतानाच नागपुरात आणखी एका चिमुकलीवर अत्याचाराचं प्रकरण समोर आलं आहे. नागपूरच्या कळमेश्वरमध्ये अवघ्या 5 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. एका शेतात या मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. या चिमुरडीवर अत्याचार झाल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
ही मुलगी गुरुवारपासून बेपत्ता होती. त्यानंतर आज संशयास्पद पद्धतीने तिचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी एका मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर काही नागरिकांनी पोलीस स्टेशनसमोर निदर्शने केली. दरम्यान शवविच्छेदनानंतर अधिक माहिती समोर येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
मृत मुलीचे आई-वडील मजुरीचं काम करतात. शाळेतून आली की अनेकदा थोड्या अंतरावर राहणाऱ्या आजी आजोबांकडे रात्री झोपायला ही चिमुकली जायची. त्याप्रमाणे गुरुवारी रात्री ती घरातून निघाली, मात्र आजी-आजोबांकडे पोहोचलीच नाही. एकीकडे आजी-आजोबांना वाटले की ती आई वडिलांकडे आहे आणि आई वडिलांना वाटले की ती आजी-आजोबांकडेच झोपली. त्यामुळे कुणीच त्या रात्री चिमुरडीचा शोध घेतला नाही.
दुसऱ्या दिवशी मुलगी दोन्ही ठिकाणी नसल्याने पालकांनी यासंबंधी पोलासांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र ती सापडली नाही. रविवारी पोलीस पाटलाने मुलीचा मृतदेह अत्यंत वाईट पद्धतीने ठेचून शेतात सापडल्याची माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी या भागात कामाला आलेल्या एका मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेला आरोपी मोहगावचा असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशनसमोर घोषणाबाजी करत आंदोलन केलं आणि आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. चिरमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा संशय आहे, मात्र शवविच्छेदनानंतरच खरी माहिती समोर येईल.

Post a Comment

Previous Post Next Post