प्रचार सभेआधी रॉकेट हल्ला, इस्रायलच्या पंतप्रधानांना सुरक्षित स्थळी घ्यावा लागला आश्रय


एएमसी मिरर वेब टीम 
ऑनलाइन न्यूज : गाझा पट्टीतून अचानक रॉकेट हल्ला झाल्यामुळे बुधवारी इस्रायलच्या पंतप्रधानांना काही वेळासाठी सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू प्रचारसभेसाठी चाललेले असताना ही घटना घडली. दक्षिण इस्रायलमधील शहरात ही प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हा रॉकेट हल्ला झाला. तणावाची स्थिती निवळल्यानंतर नेतान्याहू पुन्हा प्रचारसभेमध्ये सहभागी झाले.

अ‍ॅश्केलॉन शहरावर रॉकेट हल्ला झाल्याच्या वृत्ताला इस्रायली लष्कराने दुजोरा दिला आहे. पॅलेस्टाइनपासून हे शहर फक्त १२ किमी अंतरावर आहे. हे रॉकेट लक्ष्यापर्यंत पोहोचू शकले नाही. इस्रायलच्या आर्यन डोम एअर डिफेन्स इंटरसेप्टर सिस्टिमने हे रॉकेट हवेतच नष्ट केले. गाझा पट्टीत हमासचे नियंत्रण असून अद्यापर्यंत कोणीही या रॉकेट हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

इस्लामिक जिहाद या छोटया गटाचा मागच्या महिन्यात इस्रायली लष्कराबरोबर दोन दिवस संघर्ष झाला होता. रॉकेट हल्ला झाल्याचे सायरन वाजू लागताच नेतान्याहू यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवले. सप्टेंबरनंतरची ही अशी दुसरी घटना आहे. त्यावेळी सुद्धा अ‍ॅश्केलॉन जवळ अशाच प्रकारचा रॉकेट हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.

नेतान्याहू लिक्युड पक्षाचे नेतृत्व कायम राखतील अशी शक्यता आहे. इस्रायलमध्ये मार्च महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी नेतान्याहू यांच्यासमोर सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान असेल. अलीकडच्या काळातील इस्रायलमधील ही तिसरी निवडणूक आहे. कारण याआधीच्या दोन निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवण्यात नेतान्याहू अपयशी ठरले होते तसेच त्यांना आघाडी सरकारही टिकवता आलेले नाही. नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post