‘राष्ट्रीयत्व’ या मुद्द्याबाबत हिंदू समाज नपुंसक : संभाजी भिडे


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याबाबत हिंदू समाज नपुंसक आहे असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे.  सुधारित नागरिकत्व कायदा हा देशाला बळ देणारा कायदा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.


संभाजी भिडे यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. जगातल्या १८७ देशांमध्ये नागरिकत्वासंबंधीचा कायदा आहे. मग भारतात हा कायदा का नको? CAA ला विरोध करणारे लोक देशाची दिशाभूल करत आहेत. ममता बॅनर्जी यांनी या कायद्याची मागणी केली होती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा कायदा आणला होता. आता हेच लोक या कायद्याला विरोध दर्शवत आहेत ही बाब आश्चर्यकारक आहे असंही भिडे यांनी स्पष्ट केलं.

मतस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या देशात आहे.त्याचा फायदा घेऊन काही लोक सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवत आहेत. हा विरोध मतलबी आहे असाही आरोप संभाजी भिडे यांनी केला. सध्याच्या घडीला जी माणसं स्वतःला शिकलेली म्हणवतात तीच माणसं या कायद्याच्या बाबतीत अनेकांची दिशाभूल करत आहेत. मुस्लीम समाजही आपल्या देशाचा नागरिक आहे. मात्र त्यांच्यातही राष्ट्रीयत्वाचा अभाव आहे. मुळात हिंदूंमध्येच राष्ट्रीयत्वाचा अभाव आहे तर मुस्लीम समाजाकडून अपेक्षा काय ठेवायची? असाही प्रश्न संभाजी भिडे यांनी विचारला.

चार दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे देशद्रोही आहेत असं वक्तव्य केलं होतं. आपला देश माणसांचा आहे, पण देशभक्तांचा नाही हे दुर्दैव आहे. स्वार्थ हाच धर्म असणारे कायद्याला विरोध करत आहेत. या कायद्यामुळे काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येत भारतीयाला आनंद झाला पाहिजे. देशभक्त असणारा प्रत्येक नागरिक या कायद्याचं समर्थन करेल. याला विरोध करणारे देशद्रोही आहेत असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post