एएमसी मिरर वेब टीम
हैदराबाद : हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाले होते. या घटनेचे काही स्तरातून स्वागत तर काही स्तरातून विरोध करण्यात आला होता. या विरोधात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. या घटनेत ठार झालेल्या आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबर संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश तेलंगण उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार नाहीत.
शुक्रवारी पोलीस आणि आरोपींच्या झालेल्या चकमकीत हे चारही जण ठार झाले होते. यापूर्वी अटकेत असलेल्या या आरोपींना न्यायालयानं ७ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती. पोलीस कोठडीत असताना आरोपींकडून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले होते. आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत बंदूक खेचून घेतली आणि फायरिंग करण्यास सुरुवात केल्याने स्वसंरक्षणासाठी गोळीबार करत त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांनी दिली होती. मात्र, या घटनेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यामध्ये न्यायिक हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयाने या आरोपींचे मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.
Post a Comment