गृहखातं कुणाकडे जाणार हे विस्तारानंतर कळेल : जयंत पाटील


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा उद्या (३० डिसेंबर) विस्तार होत आहे. तिन्ही पक्षातील आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, कोणत्या पक्षाकडे कोणतं खातं असेल हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. विशेष म्हणजे गृहखातं कुणाकडे असेल याबाबतही चर्चा सुरू आहे. अर्थमंत्री जयंत पाटील यांनीही या प्रश्नाचं गुढ कायम ठेवलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थिती पार पडली. त्यानंतर बोलताना पाटील म्हणाले, “मंत्रिमंडळ विस्तारानंतरच ते कळेल.”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा अखेर उद्या विस्तार होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा यात समावेश असणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिल्व्हर ओक येथे पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि गृहखात्यासंदर्भात चर्चा झाल्याचं वृत्त असून, खातेवाटपावर अंतिम चर्चा झाल्याची माहिती आहे.

ही बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, “सध्या सहा मंत्र्याकडे दिलेली खाती ही तात्पुरत्या स्वरूपातील आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप करण्यात येईल. हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची यादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काही तासांत मुख्यमंत्र्यांकडे पाठवतील. गृहखातं कुणाकडे असेल हे विस्तारानंतर कळेल,” अशी माहिती पाटील यांनी दिली.

गृहखातं कुणाकडे जाणार?
राज्याचं गृहखातं शिवसेनेकडे राहिलं, असे शिवसेना नेत्यांकडून सुरूवातीपासून सांगितलं जात आहे. मात्र, गृहखात्यासाठी राष्ट्रवादीही आग्रही आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश असणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे वजनदार खातं दिलं जाईल. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्रीपद दिले जाऊ शकते. पण, शिवसेना हे पद सोडणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post