बदल्याच्या भावनेतून झालेला न्याय नसतो : सरन्यायाधीश


एएमसी मिरर वेब टीम 
हैदराबाद : पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरचं एकीकडे समर्थन होत आहे, तर दुसरीकडे विरोधही होत आहे. या प्रकरणावर देशाचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांनी टिप्पणी केली आहे. बदल्याच्या भावनेतून एन्काऊंटर झाला असेल, तर तो न्याय बिलकुल नसेल, असं ते म्हणाले. बदल्याच्या भावनेतून हे झालं असेल तर न्याय आपलं पावित्र्य हरवून बसतो, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
यापूर्वी वकील जीएस मणी आणि प्रदीप कुमार यादव यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ही कारवाई करताना पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या २०१४ च्या आदेशाचं उल्लंघन केलं, असं या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. एन्काऊंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांवर एफआयआर दाखल करुन चौकशी केली जावी, अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.
हैदराबादमधील पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी पोलिसांनी शिवा, नवीन, कशवुलू आणि मोहम्मद आरिफ या चार जणांना अटक केली होती. पोलीस रिमांडमध्ये असलेल्या या आरोपींना तपास प्रक्रियेचा भाग म्हणून घटनास्थळावर नेण्यात येत होतं. याचवेळी चौघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात चौघांचाही जागेवरच मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली.
पोलिसांच्या कारवाईनंतर देशभरातून सर्वसामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे समर्थन केलं आहे. लोकांनी झिंदाबादच्या घोषणा देत पोलिसांवर फुलांचा वर्षाव केला. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बलात्कार प्रकरणाचा न्याय हा कोर्टातच व्हायला हवा असे अनेकांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची टीम देखील या प्रकरणाचा तपास करण्यासाठी हैदराबादमध्ये दाखल झाली.
हैदराबादमध्ये एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिला ठार मारण्याचा या चार आरोपींवर आरोप होता. बलात्कार आणि हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती.

Post a Comment

Previous Post Next Post