भारत धर्मशाळा आहे का? राज ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. १३५ कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. देश म्हणून आपण आणखी ओझं वाहू शकत नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. आपल्या देशाला बाहेरून आलेल्या लोकांची काय आवश्यकता आहे असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक यंत्रणा निकामी ठरल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही धर्मचा माणूस असेल त्याला बाहेरून आपल्या देशात आणायची काय गरज आहे? असं ते म्हणाले. आपल्या देशात जे मुस्लिम नागरिक राहतात त्यांना असुरक्षित वाटण्याचं कारण काय? सर्व लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काही धर्मशाळा नाही. अन्य देशातून आलेल्या लोकांना हाकलवून दिलं पाहिजे. माणुसकीचा ठेका हा काही भारतानंच घेतलेला नाही. इकडे राहत असलेल्यांची चिंता मिटत नाही, तर बाहेरून आणखी लोकं का हवी, असा सवालही त्यांनी केला.
संपूर्ण देशात जी काही आर्थिक मंदी आहे त्यावरून लक्ष विचलीत करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या निमित्तानं केलं असल्याचं राज ठाकरे म्हणाले. बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तानातून येणाऱ्या मुस्लिमांना देशाबाहेर हाकलंल पाहिजे. नेपाळ, पाकिस्तानातून किती मुस्लिम आले त्याची तपासणी होणे आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.

मंदीवरुन लक्ष हटवण्याचा डाव
सध्या देशात आर्थिक मंदीचं वातावरण आहे. अजून आपल्याला मंदीचा सामना करायचा आहे. देशाच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवरुन नागरीकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसी सारखे मुद्दे समोर आणले. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हे करुन दाखवलं असे राज ठाकरे म्हणाले.

मग आधार कार्डाची गरजच काय?
आधारकार्ड मतदानासाठी चालू शकते मग नागरीकत्व सिद्ध करण्यासाठी आधारकार्ड का चालू शकत नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. आधारकार्डासाठी लोकांना तासनतास रांगेत उभं केलं त्याचा उपयोग काय? असा सवाल राज यांनी केला.


Post a Comment

Previous Post Next Post