मोदी, शाह, डोवाल यांचा पुण्यात मुक्काम


एएमसी मिरर वेब टीम
पुणे : देशभरातील पोलिस महासंचालकांच्या तीन दिवसांच्या परिषदेचं आयोजन यावर्षी पुण्यात करण्यात आल आहे. या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस तर गृहमंत्री अमित शहा तीन दिवस पुण्यात मुक्कामाला असणार आहेत. पुण्यातील पाषाण भागातील पोलिस रिसर्च सेंटर आणि आयसर या दोन संस्थांमध्ये ही तीन दिवसीय परिषद चालणार आहे. ही परिषद उद्या, शुक्रवार 6 डिसेंबरपासून ते रविवार, 8 डिसेंबरपर्यंत होणार आहे.
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंद कुमार, गृहविभागातील वरिष्ठ अधिकारी आणि देशातील वेगवगेळ्या राज्यांचे पोलिस महासंचालक उपस्थित राहणार आहेत. देशाच्या सुरक्षा धोरणांवर चर्चा करणं, देशांतर्गत सुरक्षेचा आढावा घेणं आणि पुढील वर्षासाठी देशाच्या सुरक्षेचा रोडमॅप तयार करणं हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे.
आधीच्या सरकारच्या काळात ही परिषद दिल्लीमध्ये व्हायची. परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर म्हणजे 2014 पासून त्यांनी दरवर्षी देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पोलिस महासंचालकांची ही परिषद घेण्यास सुरुवात केली. मागील वर्षी ही परिषद गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेलांच्या महाकाय पुतळ्याच्या परिसरात झाली होती. त्या आधी गुवाहाटी, गुजरातमधील कच्छचे रण, हैदराबाद आणि मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली या परिषदा झाल्या आहेत.
या परिषदेच्या निमित्ताने पुण्यात येणाऱ्या मोदी आणि शहांचा मुक्काम पुण्यातील राजभवनमध्ये असणार आहे . त्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी आधीच या सगळ्या परिसराचा ताबा घेतला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post