जाते जाते औकात बता गए लोग; नवाब मलिकांची फडणवीसांवर टीका


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी आपलं वर्षा हे निवासस्थान रिकामं केल्यानंतर बंगल्यातील भितींवर काही आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचं आढळलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या सुरूवातीच्या काही अक्षरांचा उल्लेख करत बंगल्याच्या भिंतीवर काही अपशब्द लिहिण्यात आल्याचं निदर्शनास आलं होतं. तसंच याव्यतिरिक्त ‘भाजपा रॉक्स, देवेंद्र फडणवीस रॉक्स’ अशीही वाक्य भितींवर लिहिली असल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. या संपूर्ण प्रकारावरून राज्यातील राजकारण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी शेरोशायरीतून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

कुछ दिन क्या साथ रहकर गए वो, जाते जाते औकात बता गए लोग असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. याबाबतचा व्हिडीओ समोर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानं प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी बंगला सोडला त्यावेळी भितीवर कोणत्याही प्रकारचा मजकूर लिहिला नव्हता. हे अतिशय खालच्या स्तरावरील राजकारण आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली. आमची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी लोकांना सर्व काही समजतं असं म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post