मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून अमृता यांनी महाराष्ट्रासाठी काय योगदान दिले?


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : गेल्या पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी काय योगदान दिले?, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ‘ठाकरे’ अडनावावरुन टीका केल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेने या टीकेचा निषेध केला असून काही शिवसैनिकांनी अमृता फडणवीस यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलनही केले. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे.

रूपाली चाकणकर यांनी ट्विटवरुन अमृता फडणवीस यांच्यावर टीकास्र सोडले आहे. उद्धव ठाकरेंवर अडनावावरुन टीका करणाऱ्या अमृता फडणवीस यांना ‘मुख्यमंत्र्यांच्या आडनाव बद्दल बोलण्याचा अधिकार उरलेला नाही’ असा टोला चाकणकर यांनी लगावला आहे. “गेल्या पाच वर्षांत, मुख्यमंत्री पत्नी म्हणून, आपण काय योगदान दिले महाराष्ट्रातील जनतेला, याचं थोडंतरी आत्मपरीक्षण करा आणि तसाही महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला आणि आपल्या अहंकारी विचारांना नाकारले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आडनावाबद्दल बोलण्याचा अधिकार उरलेला नाही आपल्याला,” असं आपल्या ट्विटमध्ये चाकणकर यांनी म्हटलं आहे.

दुसऱ्या ट्विटमधून चाकणकर यांनी अमृता यांना एक सल्ला दिला आहे. पराभवामुळे निराश झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अमृता यांनी मानसिक आधार द्यावा असा टोला चाकणकर यांनी लगावला आहे. “अमृताताई, खरं तर पराभवामुळे आलेल्या वैफल्यग्रस्त मानसिकतेतुन आता आपण स्वतः सावरून, माजी मुख्यमंत्र्यांना देखील मानसिक आधार द्यायला हवा होता, पण साराचं अंधार दिसतोय आपल्या विचारात,” असं चाकणकर म्हणाल्या आहेत.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस
माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी, “केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात”, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती. फडणवीसांच्या याच ट्विटचा धागा पकडून अमृता यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.. देवेंद्र फडणवीसांच्या राहुल गांधींबाबतच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना अमृता यांनी, “खरं आहे देवेंद्र फडणवीसजी… त्याचप्रमाणे केवळ ठाकरे आडनाव लावल्यानेही कोणी ठाकरे होत नाही… त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं… एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते,” असं ट्विट केलं होतं.

Post a Comment

Previous Post Next Post