प्रदूषणामुळं आयुष्य कमी होत नाही : प्रकाश जावडेकर


एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली:
'प्रदूषण आणि आयुर्मान कमी होण्याचा थेट संबंध नाही. भारतात झालेल्या कुठल्याही अभ्यासावरून असा निष्कर्ष पुढं आलेला नाही. त्यामुळं लोकांमध्ये विनाकारण कुणी भीती पसरवू नये,' असं आवाहन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी लोकसभेत केलं.
देशातील वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. प्रदूषणामुळं भारतीयाचं सरासरी आयुर्मान ४.३ वर्षांनी कमी होत असल्याचा मुद्दा तृणमूल काँग्रेसच्या खासदार ककोली घोष दास्तिदार यांनी उपस्थित केला होता. जावडेकरांनी हा समज चुकीचा असल्याचं सांगितलं. 'लोकसभेच्या यापूर्वी झालेल्या हिवाळी अधिवेशनातही उत्तर भारतातील प्रदूषणावर अनेकदा चर्चा झाली आहे. हिवाळ्याच्या आधी या प्रदेशातील हवा बिघडते हे अनेकदा निदर्शनास आलं आहे. केंद्र सरकार अत्यंत आक्रमकपणे यावर उपाययोजना करत आहे. प्रत्येक शहराची स्वत:ची अशी प्रदूषणाची समस्या असते. फक्त प्रदूषण करणाऱ्या घटकांचं प्रमाण वेगवेगळं असतं. त्याचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक शहरानं आराखडा तयार करावा, अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत. तसंच या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारनं प्रत्येक शहराला १० कोटी रुपये दिले आहेत,' असं त्यांनी सांगितलं.
'औद्योगिक, वाहतूक, धूळ व जळण हे प्रदूषणाचे प्रमुख घटक असल्यानं त्याला आळा घालण्यावर सरकारचा भर आहे. त्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. प्रदूषणाची समस्या जगभर आहे. लॉस एंजलिस, युपरोप सगळीकडंच. विविध घटकांमुळं हे होतंय. मात्र, त्यातील कशाचाही आर्युमान घटण्याशी थेट संबंध नाही. तसे निष्कर्ष काढणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांचं संशोधन प्रत्यक्ष माहितीवर आधारलेलं नसतं. दुय्यम आकडेवरून ते अंदाज बांधतात,' असं ते म्हणाले. देशभरातील वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सरकारनं नॅशनल क्लीन एअर कार्यक्रम सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं.

Post a Comment

Previous Post Next Post