'देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी सरकार बनवणं माझ्यासाठी धक्का'


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं हा माझ्यासाठी एक धक्का होता असं राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
एबीपी माझा वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत त्यांना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सरकार बनवण्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, राज्य राष्ट्रपती राजवटीतून बाहेर पडले त्याचा मला आनंद झाला होता. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी अभिनंदन केलं. पण मला या सरकार स्थापनेने फार आनंद झाला नाही. माझ्यासाठी तो धक्का होता.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या गनिमी काव्याची कल्पना होती का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, मला काहीच कल्पना नव्हती. पक्षाच्या कोअर कमिटीची सदस्य असली तरी मला त्या निर्णयाबद्दल काही माहित नव्हते. जेव्हा मी शपथविधी पाहिला तेव्हा तो माझ्यासाठी सुद्धा धक्का होता, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
अजित पवारांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, अजित पवारांबरोबर स्पष्टवक्ते नेते आहेत. पण माझा त्यांच्याशी व्यक्तीशा कधीही संबंध आला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार काही बोलता येणार नाही.

मी पक्ष सोडण्याच्या वावड्या उठल्यामुळे अस्वस्थ झाले
मी फेसबुकवर पोस्ट लिहिली, त्यामागे कोणतीही अस्वस्थता नव्हती. मी नाराज नव्हते, अस्वस्थ नव्हते. माझ्या मनात खदखद नव्हती. मात्र १ डिसेंबर ते १२ डिसेंबर ज्या ज्या वावड्या उठल्या त्यामुळे मी अस्वस्थ झाले, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मी पॉवरगेम खेळते आहे, विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही आहे, अशाही काही चर्चा रंगल्या होत्या. त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मी कोअर कमिटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देते, अशी घोषणा केली, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.


Post a Comment

Previous Post Next Post