एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर डाव्याबाजूनं ऐकायला येत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी फडणवीस सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष असलेल्या हरिभाऊ बागडे यांना टोला लगावला. तसेच या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला सर्व समान दिसलं पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नाना पटोले यांची ठाकरे सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर पाटील बोलत होते. भाजपाने ही निवडणूक बिनविरोध केली यासाठी त्यांचे आभार मानताना जयंत पाटील म्हणाले, काल विरोधी पक्षाचं जेवढ डॅमेज झालं ते आज त्यांनी भरुन काढलं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. बागडे साहेबांनी आम्हाला पाच वर्षे कायम प्रमाने वागणूक दिली. मात्र, या खुर्चीचा एक गुण आहे की एकदा त्या खुर्चीवर बसलं की डाव्या बाजूनं ऐकायला येत नाही. पण अध्यक्षांनी डाव्या बाजूला जास्त लक्ष द्यायला पाहिजे. त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. सभागृहात २८८ सदस्य असतात त्या प्रत्येकाला बोलायच असतं, त्यांना आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्याची संधी मिळायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
नाना पटोलेंचे अभिनंदन करताना जयंत पाटील म्हणाले, लोकसभेला निवडून गेल्यानंतरही आपल्याला काही गोष्टी पटल्या नाही त्यामुळे आपण पदाचा राजीनामा दिला हे आपलं वैशिष्ट आहे. मात्र, आता इथं तुम्हाला अस करता येणार नाही. पण शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम आपण खूप चांगल्या प्रकारे करु शकता. एका शेतकरी नेत्याची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने मला खात्री आहे की ते सभागृहाला न्याय देतील आपल्याला चांगले मार्गदर्शन करतील अशी आशा आहे.
पंतप्रधान मोदींच्या अपेक्षेप्रमाणे वागाल : जयंत पाटील
जयंत पाटील म्हणाले, सभागृहात शांतता राहिली पाहिजे. वेलच्या जवळ जाणे योग्य नाही सभात्याग करायचाच असेल तर शिस्त पाळत कालच्याप्रमाणे बाहेर निघून गेलात तरी चालेल. वॉक आऊट करायच्या प्रथा ज्या आहेत त्या देखील आपण गटनेत्यांसोबत बसून ठरवल्या पाहिजेत, अशी अपेक्षा करताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या विधानाचा दाखला दिला. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोदींनाही हेच अपेक्षित असल्याचे सांगत त्यांनी भाजपाला टोला लगावला.
माझं व्यंग आणीबाणीतलं : हरिभाऊ बागडे
जयंत पाटलांच्या टिपण्णीवर बोलताना हरिभाऊ बागडे म्हणाले, “हे माझं लहानपणापासूनचं व्यंग असून ते आणीबाणीतलं आहे. याचा मला अभिमान आहे. आणीबाणीच्या काळात माझ्याकडे सत्याग्रही काढण्याचं काम होतं. रात्रभर आम्ही यासाठी हिंडत असू. हे काम करताना डिसेंबरची थंडी असल्याने मी एकदा बेशुद्ध पडलो. त्यानंतर माझ्या कानाच्या नसा बंद झाल्या होत्या, त्यामुळे मला एका बाजूने ऐकता येत नाही.”
Post a Comment