अहमदनगर : कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याला 10 हजार रुपये भाव


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी कांदा लिलाव घेण्यात आले. या लिलावात लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 8 हजार 100 ते 10 हजार 100 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. काही दिवसांपासून कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. शनिवारी बाजार समितीत जवळपास 60 हजार 437 गोण्या कांद्याची आवक झाली.
गावरान कांद्याची आवक बंद झाली आहे. सध्या लाल कांदा येत आहे. परतीच्या पावसामुळे कांद्याचे आगार असलेल्या महाराष्ट्रासह इतर काही राज्यांतील कांद्याचे पीक वाया गेले आहे. त्यामुळे बाजारात नवीन कांद्याची आवक मंदावली आहे. दुसरीकडे देशभरात कांद्याची मागणी वाढली आहे. दिवाळीनंतर कांद्याच्या दराचा रोज नवा विक्रम होत आहे. मध्यंतरी कांदा बारा हजारांच्या पुढे गेला होता. आता मात्र दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. एक नंबरच्या लाल कांद्यास 10 हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. शनिवारी बाजार समितीतील लिलावात एक नंबर कांद्यास प्रति क्विंटल 8 हजार 100 ते 10 हजार 100 रुपये, दोन नंबर कांद्यास 4 हजार 500 ते 8 हजार रुपये प्रति क्विंटल तसेच तीन नंबर कांद्यास 2 हजार 100 ते 4 हजार 400 रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव मिळाले. किरकोळ बाजारपेठेत कांद्याच्या दरात तेजी आहे. सध्या 70 ते 80 रुपये किलो असा दर आहे. बाजारात सध्या येणारा कांदा आकाराने लहान आणि ओला आहे. जुना कांदा शिल्लक नाही. लहान ते मध्यम आकाराचा कांदाच मिळत आहे. हॉटेलचालकांची तर अडचण झाली आहे. हॉटेलात आता कांदा दिसेनासा झाला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post