पी चिदंबरम अखेर तिहारमधून बाहेर


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात आज दोन लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्यानंतर आज सायंकाळी चिदंबरम अखेर तिहार तुरूंगातून बाहेर पडले.

चिदंबरम तिहार तुरूंगातून बाहेर आले तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांसह त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी राहुल गांधी जिंदाबाद, काँग्रेस जिंदाबाद, पी चिदंबरम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. याप्रसंगी त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांची उपस्थिती होती.
आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. अटक झाल्यापासून पी चिदंबरम जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन दिला आहे. आता ईडीच्या गुन्ह्यातही त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post