पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर जाहिर करणार भूमिका


एएमसी मिरर वेब टीम
परळी : पंकजा मुंडें आता पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर येण्याचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करणार अशा चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. पंकजा मुंडेंनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यामातून हे आवाहन केलं आहे. तसेच पुढिल राजकीय वाटचालीसंदर्भातही चर्चा करणार असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. एवढच नाहीतर राजकारणात झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदललेल्या समीकरणांबाबतही त्या बोलणार असल्याचं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.काय आहे पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये?
पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की, 'दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले. 'आधी देश,नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:' हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले.' पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ' पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. "ताई आम्हाला भेटायला वेळ द्या," .."ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या "...किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली.'
पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबुक पोस्टमधून मतदारांचे आभारही मानले आहेत. त्या म्हणाल्या की, 'मी तुम्हा सर्वांची खुप खुप आभारी आहे. मला याची पुर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहील्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जवाबदारी म्हणुन राजकारणात राहीले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे.'

Post a Comment

Previous Post Next Post