एएमसी मिरर वेब टीम
हैदराबाद : हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. काहीजणांनी पोलिसांच्या कारवाईचं कौतुक केलं आहे तर काहींनी चकमक करण्याची पद्धत चुकीची असल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या वृंदा ग्रोवर यांनीही ही चकमक चुकीच्या पद्धतीने केल्याचं म्हटलेय.
हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी केलेलं एन्काऊंटर चुकीचं आणि कायद्याला धरून नव्हतं, त्यामुळे पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुप्रीम कोर्टाच्या वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या वृंदा ग्रोवर यांनी केली आहे. शुक्रवारी हैदाबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तपासासाठी घटनास्थळी नेलं. त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं.
अॅड. वृंदा ग्रोवर यांनी हा प्रकार अयोग्य असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. ‘हे एन्काऊंटर कायद्याला धरून नव्हतं. या सर्व प्रकरणाची स्वतंत्र न्यायालयीन तपासणी व्हावी. महिलांच्या नावावर पोलिसांनी एन्काऊंटर करणं चुकीचं आहे.’
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनीही या एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या की, ‘एन्काऊंटर प्रत्येकवेळी व्यवस्थित आणि सत्य असतील असे नाही. मारले गेलेले आरोपी पोलिसांकडील शस्त्र घेऊन पळत होते व त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याचं सांगितलं जातंय. मात्र, यात संशयास जागा आहे. ‘
Post a Comment