अहमदनगर : सक्षम लोकपाल अस्तित्वात आणण्यासाठी रविवारी आंदोलन


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : देशात सक्षम लोकपाल अस्तित्वात आला नसून, लोकपाल पांढरा हत्ती ठरल्याचा आरोप करीत रविवार दि.8 डिसेंबर रोजी ‘मेरे देश मे मेरा अपना घर’ आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसदच्यावतीने सक्षम लोकपाल अस्तित्वात आणण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. शासन, प्रशासनातील वाढलेली अनागोंदी व भ्रष्टाचाराचा निषेध नोंदवित शहरातील मोकाट जनावरांना हळदी-कुंकू वाहून औक्षण करीत सरकारसह जनेतेचे लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
भ्रष्टाचार थांबविण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने व जनतेच्या रेट्यातून सरकारवर दबाव टाकून देशात जनलोकपाल कायदा अस्तित्वात आला. मात्र भाजपने लोकपालची खरी ताकतच काढून घेतल्याने लोकपाल भरकटलेल्या अवस्थेत आहे. त्याचा उपयोग होत नसून, लोकपाल फक्त पंचतारांकित जीवन जगत आहे. महिन्याकाठी सरकारला लोकपालसाठी 50 कोटी रुपये खर्च करावे लागत आहे. सक्षम लोकपाल अस्तित्वात आला नसल्याने शासन, प्रशासनातील अनागोंदी व भ्रष्टाचार उफाळला आहे. तर नागरिकांच्या हाती निराशा आली आहे. सर्वसामान्यांची कामे वेळेवर होत नाही. याची प्रचिती नगरकारांना देखील उड्डाणपुलाच्या रुपाने आली आहे. सरकारच्या कामाचा लेखाजोखा घेण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना आहे. मात्र लोकप्रतिनिधी व अधिका-यांना जाब विचारणे नागरिकांना सध्यातरी शक्य नाही. यांच्यावर नियंत्रण व वचक ठेवण्यासाठी संघटनेच्यावतीने केंद्रासह राज्यात शॅडो कॅबिनेट आनण्याची मागणी करण्यात आली आहे. केंद्रात तर विरोधी पक्ष नेताच अस्तित्वात नसल्याने विरोधकांचा आवाज पुर्णत: दाबला गेला आहे.
सर्व वैयक्तिक पातळीवर भांडताना दिसत आहे. सगळ्या विरोधकांनी मिळून शॅडो कॅबिनेट बनविण्याची गरज असल्याची भावना संघटनेच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post