पुणे : टोळक्याकडून वाहनांची तोडफोड


एएमसी मिरर वेब टीम 
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आमच्याकडे रागाने का बघतो असे म्हणून परिसरात दहशत माजवत कोयता, दगड आणि लाकडी दांडक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना पिंपरीमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेत काही वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
जावेद साबीर सय्यद, भावड्या धोतरे, वसीम साबीर सय्यद (ताब्यात) आणि इतर एक व्यक्ती अशा चौघांनी गाड्या फोडल्या. या प्रकरणी अभिजित मोरे यांनी पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमधील खराळवाडी येथे रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी यांचा भाऊ घराबाहेर थांबला असता आरोपी जावेद, भावड्या, वसीम आणि इतर एक व्यक्तीनं आमच्याकडे रागाने का बघतो असे म्हणून त्याच्याबरोबर किरकोळ वाद घातला.
त्यानंतर स्वतः फिर्यादी हे टेम्पो घेऊन आले असता आरोपी आणि त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर झालेल्या शाब्दीक चकमकीनंतर त्यांच्यात हाणामारीही झाली. दरम्यान, परिसरात दहशत पसरवत कोयता, दगड आणि लाकडी दांडक्याने टोळक्यानं काही वाहनांची तोडफोडही केली. याप्रकरणी वसीम नावाच्या एका व्यक्तीला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post