तरुणानों, मोदी-शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं : राहुल गांधी


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : ढासळती अर्थव्यवस्था, एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, रोजगाराच्या प्रश्नांमुळे मोदी सरकार तुमच्या रागाचा सामना करू शकत नाही. मोदी आणि शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे,” असा आरोप राहुल यांनी केला.
डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर, एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरून मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. विशेषतः गेल्या आठवड्यात पंतप्रधानाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार असलेल्या डॉ. अरविंद सुब्रमण्यम यांनी अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये असल्याचं सांगत चिंता व्यक्त केली. त्यावरूनही विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. दुसरीकडं सुधारित नागरिकत्व कायद्यावरून ईशान्येकडील राज्यांसह संपूर्ण देशभरात विरोध होऊ लागला आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांनी काढलेल्या आंदोलनानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले.
अर्थव्यवस्था, सुधारित नागरिकत्व कायदा आणि तरुणांच्या आंदोलनावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून भाष्य केलं आहे. “मोदी आणि शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे. अर्थव्यवस्थेला पोहोचवलेली हानी आणि घटलेल्या रोजगारामुळे मोदी सरकार तरुणांच्या रागाला सामोरं जाऊ शकत नाही. त्यामुळे ते आपल्या प्रिय असलेल्या भारतामध्ये फूट पाडून द्वेष लपवत आहेत. आपण प्रत्येक भारतीयाविषयी प्रेम व्यक्त करून त्यांचा पराभव करू शकतो,” असं राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्याबरोबर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर टीका केली होती. “कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्यासह जे उपाय सरकारनं केले आहेत, ते त्यांच्या जवळ असलेल्या उद्योजकांना मदत करणारे आहेत. खरतर ज्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत गेले. नोकऱ्या गेल्या. कमी उत्पन्न असणाऱ्यांना मदत करण्याची ही वेळ आहे. तळाला असणाऱ्या २५ ते ३५ कामगार वर्गाला मदत करण्याची वेळ आहे. पण, सरकारनं केवळ ८०० कंपन्यांना सरकारनं मदत केली,” असं चिदंबरम यांनी म्हटलं होतं.


Post a Comment

Previous Post Next Post