'तीन पक्षांचं सरकार असल्याने आपल्याकडे पर्याय मर्यादित'


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर साधारण महिनाभर चाललेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांच्या महाविकासआघाडी सरकारचा अखेर काल मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, हे सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची या शपथविधी सोहळ्यास अनुपस्थिती होती. त्यांचे बंधू सुनील राऊत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा होती. मात्र ते स्थान न मिळाल्याने, संजय राऊत हे नाराज झाल्याच्या बातम्यांनी यामुळे जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी, तीन पक्षांचं सरकार असल्याने आपल्याकडे पर्याय मर्यादित आहेत, ही गोष्ट लोकांनी समजून घेतली पाहिजे. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

तीन पक्षांचं सरकार असल्याने आपल्याकडे पर्याय मर्यादित आहेत, ही गोष्ट लोकांनी समजून घेतली पाहिजे. तिन्ही पक्षांमध्ये सक्षम लोक आहेत. आपल्या लोकांनी थोडा धीर धरायला हवा, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत ही आनंदाची बाब आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मी पक्षावर नाराज नाही : संजय राऊत
नाराज असल्याचं वृत्त आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात माध्यमांशी बोलताना, सुनील राऊत यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्यानं मी पक्षावर नाराज नाही. नाराजीचं काहीच कारण नाही. सत्ता स्थापन करण्यात आमचा वाटा आहे. तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे विलंब झाला. काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना दिल्लीत जावं लागतं. शिवसेना-राष्ट्रवादीचं निर्णय महाराष्ट्रातच होतात, असंही राऊत म्हणाले होते.
विधानभवनात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा काल पार पडला. एकूण ३६ जणांचा शपथविधी झाला. यामध्ये २६ जणांनी कॅबिनेट तर १० जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार अजित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनाही कॅबिनेटमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post