'नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर शिवसेनेची तटस्थ भूमिका काँग्रेसच्या दबावापोटी'


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला लोकसभेत पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं राज्यसभेत तटस्थ भूमिका घेण्याचा विचार करणं हे काँग्रेसच्या दबावापोटी आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. संसदीय कामकाज समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. काल शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. मग आता राज्यसभेतील मतदानाआधी शिवसेना संभ्रमात कशामुळे आहे, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना आपली जुनी भूमीका कायम ठेवल आणि कोणाच्या दबावाखाली येणार नाही, अशी अपेक्षा फडणवीसांनी या वेळी व्यक्त केली.
महाराष्ट्र विकास आघाडीचं खातेवाटपच अद्याप जाहीर झालं नसल्यानं अधिवेशनात कुणाला प्रश्न विचारायचे, असा टोलाही फडणवीसांनी या वेळी दिला आहे. फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला जवळपास दोन आठवडे झाले आहेत. अद्याप खातेवाटपच केलेलं नाही. अशा परिस्थितीत उत्तरं कोण देणार असेही ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंसह काँग्रेस, राष्ट्रवादीनं शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली होती. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मागणीचं पुढे काहीच झालेलं नाही. शेतकऱ्यांना जी मदत मिळाली पाहिजे ती मिळत नाही. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार आहे. चार कामे कमी केली तरी चालेल पण मदत मिळाली पाहिजे.
यासोबतच अनेक प्रकल्पांवर ठाकरेंनी लावलेल्या स्थगितीवरही बोट ठेवत फडणवीसांनी टीका केली आहे. फडणवीस म्हणाले, खातेवाटप तर अद्याप झालेलं नाही पण सुरू असलेल्या प्रकल्पाच्या स्थगतीच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत पाच ते सहा दिवसांच अधिवेशन म्हणजे एक औपचारिकता आहे. जी महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार पार पाडत आहे.
लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला काल पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेने आज आपली भूमिका बदलली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत राज्यसभेत विधेयकाला समर्थन देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. देशातील नागरिकांसमोरील रोजच्या जीवनातील आवश्यक प्रश्न सोडवणं अधिक महत्त्वाचं आहे. आम्ही काय भूमिका घ्यावी, हे आम्हाला कोणी सांगू नये, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

Post a Comment

Previous Post Next Post