एएमसी मिरर वेब टीम
नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमधील जामिया विद्यापीठात घडलेल्या प्रकारावर भाष्य केलं असून जालियनवाला बाग हत्याकांडाशी तुलना केली आहे. दिल्लीत जे काही झालं ते जालियनवाला बागची आठवण करुन देणारं आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
देशात अशांतता आणि अस्वस्थततेचं वातावरण निर्माण केलं जात आहे. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरत आहे. दिल्लीत विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. जणू काही जालियनवाला बागेतले दिवस परत आले की काय? जालियनवाला बाग झाला तेव्हा ज्याप्रमाणे हिंसाचार घडला होता, तसंच वातावरण देशात पुन्हा निर्माण केलं जात आहे की काय अशी भीती देशात आणि तरुणांच्या मनात आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ज्या राज्यात देशात तरुण बिथरतो तो देश स्थिर राहू शकत नाही. म्हणून मी केंद्र सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही तरुणांना बिथरवू नका. ते भावी आधारस्तंभ आहेत. तरुण आपली शक्ती आहेत. हा तरुण बॉम्ब आहे, त्याची वात पेटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करु नये अशी विनंती आहे, असेही ते म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपालाही त्यांनी उत्तर दिलं. मी शेतकऱ्यांना शब्द दिला आहे आणि तो मी पाळणार आहे. आम्हाला तुम्ही करायला लावलं, असा आव विरोधकांनी आणू नये. प्रश्न मांडण्याची पद्धत आहे. बोंबलून प्रश्न मांडता येत नाही. उत्तर न ऐकता बोंबलत बसलात, तर जनतेसमोर तुमचं बिंग फुटेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
सामना वाचत नाही म्हणणाऱ्यांनीच ‘सामना’ दाखवला
सामना हे वृत्तपत्र कधीही वाचत नाही असं सांगणाऱ्यांनी आज सभागृहात सामना दाखवला. याचाच अर्थ सामना हे सामान्य माणसाचं शस्त्र आहे हे सिद्ध झालं आहे. सामना तेव्हाच वाचला असता तर आमच्याशी सामना करण्याची वेळ आली नसती अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
Post a Comment