भाजपपेक्षा शिवसेना लाखपटींनी चांगली : बाळासाहेब थोरात


एएमसी मिरर वेब टीम
संगमनेर :
कोणत्याही एका पक्षाचे सरकार येईल असा काळ आता राहिला नाही. भाजपाचे राजकारण राज्याच्या आणि देशाच्या हिताचे नाही, त्यामुळे त्यांना बाजूला ठेवणे ही काळाची गरज होती. त्यांच्यापेक्षा मराठी बाणा दाखवणारी शिवसेना लाख पटीने चांगली. शिवाय घटनेच्या चौकटीत राहून राज्यकारभार करण्याचा विश्वास शिवसेनेने दिल्याने आम्ही त्यांना साथ दिली आणि महाविकास आघाडीचे सरकार आले, असे वक्तव्य मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. 
राज्यात सत्ता स्थापनेनंतर प्रथमच थोरात संगमनेर येथे आले. त्यांचे भव्य स्वागत होऊन नागरी सत्कारही करण्यात आला. ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार किरण लहामटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कांचन थोरात, अशोक भांगरे, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, तालुक्यातील जनतेचे अलोट प्रेम आणि पाठिंब्याच्या जीवावर आपण सलग आठव्यांदा विधानसभेत पोहोचलो. परंतु यापूर्वी कधीही पाहिला नव्हता, असा काळ निकालानंतरच्या महिना भरात अनुभवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी दाखवलेला मराठी बाणा आणि धाडसाचे कौतुक केले पाहिजे. वास्तविक आम्ही विरोधात बसण्याची तयारी केली होती. परंतु शिवसेनेने प्रस्ताव दिल्याने आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनुकूलता दर्शविल्याने आघाडीचे पाऊल पुढे पडले. अशाही स्थितीत दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींचे मन वळवणे, ही बाब सोपी नव्हती. मात्र, सामान्य जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी पूर्णत: घटनेच्या चौकटीत राहून राज्यकारभार चालवण्यावर तिनी पक्षांचे एकमत झाल्याने त्यात यश आले. लोकसभेसाठी आमदार कांबळे यांना खूप मदत केली. मात्र, त्यांनी काहीही न सांगता दुसरीकडे गेले आणि तिथे लहू कानडे आमदार झाले. अकोलेतही असेच घडले. आता परिस्थिती बदलली आहे. जे पक्ष सोडून गेले, त्यांची जागा आता नवीन लोकांनी घेतली आहे. त्यामुळे अशा लोकांना पक्षात घेताना नवीन लोकांची अनुकूलता असेल तरच विचार करू. निळवंडे धरण आपण पूर्ण केले आणि आता त्याचे कालवे करण्याची जबाबदारीही आपलीच आहे, याची आपल्याला जाणीव असल्याचेही ते म्हणाले.
संगमनेरकरांनी केलेल्या अभूतपूर्व स्वागताने आपण भारावून गेलो असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार डॉ. तांबे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार यावे ही महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा होती. आघाडी होण्यात थोरातांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता चांगले सरकार देण्याची जबाबदारी महाआघाडीवर असून ती पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post