पंकजाच नव्हे, अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात : संजय राऊत


एएमसी मिरर वेब टीम
नाशिक : भाजपा नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राज्यात सुरु आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजाच काय राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
राऊत म्हणाले, पंकजा मुंडेंबाबत तुम्हाला १२ डिसेंबरलाच कळेल. पंकजाच काय शिवसेनेच्या वाटेवर अनेक मोठी लोक आहेत. राज्यात आता आमचं सरकार विराजमान झालं आहे, असं सांगताना महाराष्ट्राची आर्थिक स्थिती गंभीर असल्याचे ते म्हणाले. तसेच बुलेट ट्रेनचं ओझं आमच्यावर नको अशा शब्दांत त्यांनी या प्रकल्पाला स्थगितीच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला दुजोरा दिला. तसेच नाणारबाबतच्या मागणीवर मुख्यमंत्री विचार करतील, असेही राऊत म्हणाले. भाजपा खासदार अनंत हेगडे यांच्या दाव्यावर फडणवीस नाही तर मुख्य सचिव खुलासा करतील, असेही ते म्हणाले.
राज्यातील खाते वाटपावर बोलताना संजय राऊत म्हणाले, मंत्रीमंडळाचा विस्तार कधीही होऊ शकतो. खातेवाटपावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद असल्याच्या प्रश्नावर मी त्यांच्या बैठकांना उपस्थित असतो त्यामुळे असं काहीही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच गृहमंत्रीपद राष्ट्रवादी की शिवसेनेला द्यायचे याचा निर्णयही मुख्यमंत्री घेतील, असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post