फाशी होत नसेल तर एन्काउंटर योग्यच : अण्णा हजारे


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
‘देशात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहे. त्याचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवूनही आरोपींना लवकर फाशी होत नसले तर पोलिसांनी केलेले एन्काउंटर योग्यच आहे,’ अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे.
हैदराबाद येथील एका डॉक्टर महिलेवरील बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले. यासंबंधी प्रसारमाध्यमांकडे अण्णा हजारे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘हैदराबादमधील अत्याचार आणि खुनाच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पोलिस चकमकीत आरोपी ठार झाल्यावर समाधान व्यक्त होत आहे. काही सामाजिक कार्यकर्ते, वकील, नेते मंडळी या चकमकीला गुन्हा समजत असतील. मात्र, अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना लवकर फाशी होत नसेल तर एन्काउंटर योग्यच आहे. दिल्लीतही पूर्वी अशीच अत्याचाराची घटना घडली होती. त्यातील आरोपींनाही अद्याप फाशी झालेली नाही. हैदराबादच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून जात होते. जर ते यशस्वी झाले असते तर त्यांच्याकडून पुन्हा असाच गुन्हा घडला असता तर त्याला जबादार कोणाला धरले असते? आपल्या देशाची घटना सर्वोत्तम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वंकश विचार करून घटना तयार केली आहे. मात्र, या घटनेच्या चौकटीत राहून लवकर न्याय मि‌ळत नसेल तर अशा पोलिस चकमकीला योग्यच म्हणावे लागेल,’ असं हजारे म्हणाले.


Post a Comment

Previous Post Next Post