मंत्रीमंडळ विस्तार : राहुरीला ६७ वर्षांनी तर नेवासे तालुक्यात प्रथमच संधी


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : राहुरी मतदारसंघात १९५२ मध्ये ल. मा. पाटील राज्य मंत्रिमंडळात होते. त्यानंतर आतापर्यंत राहुरीला कधीही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. थेट ६७ वर्षांनी म्हणजे २०१९ मध्ये प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने तालुक्याला मंत्रिपद मिळाले आहे. तर दुसरीकडे नेवासे तालुक्यात व स्वतंत्र नेवासे मतदारसंघ उदयास आल्यानंतर शंकरराव गडाख यांच्या रूपाने प्रथमच संधी मिळाली. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात सध्या दिवाळी सुरु असल्याचे चित्र आहे.

काँग्रेस आघाडीच्या सत्ता काळात जिल्ह्यातील थोरात, विखे, पिचड, काळे, कोल्हे, निंबाळकर अशा दिग्गज परिवारांनी मंत्रिपदे मिळवली. थोरात-विखे-पिचड तर कायमच मंत्री राहिले आहेत. मात्र, साखर कारखाने, शिक्षण संस्था व जिल्हा बॅंकेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या गडाख व तनपुरे परिवारांना मंत्रिमंडळात कधी संधी दिली गेली नाही. ही उणीव आता शिवसेनेच्या ठाकरे सरकारच्या काळात भरुन निघाली आहे.

अख्खे आयुष्य कॉंग्रेस, राष्ट्रवादीत घातलेले व कधीही मंत्रिपदे न मिळालेले जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व प्रसाद तनपुरे यांच्या मुलांना यंदा मंत्रिपदे मिळाली. विखे परिवारालाही सुरुवातीच्या काळात कॉंग्रेसने मंत्रिपदापासून कायम दूर ठेवले होते. मात्र, १९९५ मध्ये शिवसेना सत्ता असताना विखे परिवाराला पहिल्यांदा मंत्रिपद मिळाले होते. त्या वेळी (स्व.) बाळासाहेब विखे केंद्रात तर राधाकृष्ण विखे राज्यात मंत्री झाले होते. आताही शिवसेनेच्या सत्तेतच जिल्ह्यातील आणखी दोन मोठ्या राजकीय घराण्यात पहिल्यांदाच मंत्रीपद मिळाले आहे. गडाख यांच्या रुपाने नेवासे तालुक्यात प्रथमच मंत्रीपद मिळालेय. तर दुसरीकडे राहुरीत ६७ वर्षानंतर मंत्रीपद मिळालेय. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात सध्या दिवाळी सुरु असल्याचे चित्र आहे.

Post a Comment

Previous Post Next Post