घसरता जीडीपी हेच ‘अच्छे दिन’ आहेत का?


एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना काल (बुधवार) जामीन मंजूर झाल्यानंतर ते तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यानंतर त्यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देशाचा घसरता जीडीपी हेच भाजपासाठी ‘अच्छे दिन’ असल्याची टीका त्यांनी केली आहे.
चिदंबरम म्हणाले, अर्थव्यवस्थेबाबत मोदी सरकार दिशाहीन आहे. देशाचा जीडीपी सातत्याने घसरत आहे. मात्र, यासाठी कारणीभूत ठरलेल्या आपल्या चुका स्विकारण्यापेक्षा त्यावर अजब तर्क लढवले जात आहेत. देशाचा घसरता जीडीपी हेच भाजपासाठी ‘अच्छे दिन’ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. मागील विकास दराचा उल्लेख करताना ५ टक्के विकास दर देखील विश्वासदर्शक नसल्याचे ते म्हणाले. मोदी सरकारमध्ये अर्थव्यवस्था सांभाळण्याची क्षमता नाही. देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्याची क्षमता काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये आहे मात्र देशाला आता यासाठी वाट पहावी लागणार आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे. यासाठी सरकारकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. सरकारने याबाबत हट्टी भुमिका घेतली आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि कर दहशतवादामुळे देशाची अर्थव्यवस्था सध्या आपल्या वाईट काळातून चालली आहे. या सरकारने अच्छे दिन आणण्याचा दावा केला होता. मात्र, मी तुमच्यासमोर गेल्या सहा महिन्यांचे आकडे ठेवतो. या आकड्यांनुसार, विकास दर ८ टक्क्यांवरुन ७ टक्क्यांवर, त्यानंतर ६.६ पुढे ५.५ त्यानंतर आता ४.५ टक्के असा घसरत गेला आहे. हेच सरकारचे अच्छे दिन आहेत का? असेही चिदंबरम म्हणाले.
हे कसले अच्छे दिन हे विचारताना चिदंबरम म्हणाले, जर वर्षाच्या शेवटी विकास दराने ५ टक्क्यांना स्पर्श केला तर आपण स्वतःलाच भाग्यवान समजू. देशाचे मोठे अर्थशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. अरविंद सुब्रमण्यम यांनी जीडीपी ५ टक्के राहिल असा इशाराही यापूर्वी सरकारला दिला होता. मात्र, आता स्थिती त्यापेक्षाही खराब बनली आहे. मात्र, नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदी यावर मौन बाळगून आहेत. या मुद्द्यावर आपल्या मंत्र्यांना त्यांनी खोटं बोलण्याची सूट दिली आहे.
काश्मीरबाबत बोलताना चिदंबरम म्हणाले, काल रात्री ८ वाजता मी तुरुंगातून बाहेर आलो आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर मी काश्मीरमधील त्या ७५ लाख लोकांसाठी प्रार्थना केली ज्यांना ४ ऑगस्टपासून अद्याप स्वातंत्र्य मिळालेलं नाही. काश्मीरातील नेत्यांबाबत मला चिंता वाटत आहे. ज्यांना कोणत्याही गुन्ह्याशिवाय कैदेत ठेवण्यात आले आहे. जर आपण आपल्या स्वातंत्र्याबाबत बोलत असू तर आपल्याला त्यांच्या स्वातंत्र्याची लढाई देखील लढली पाहिजे.

मंत्री म्हणून माझी कारकीर्द स्वच्छ : चिदंबरम
माजी अर्थमंत्री असताना घोटाळा केल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावर आहे. यावर भाष्य करताना चिदंबरम म्हणाले, मंत्री असतानाचे माझे रेकॉर्ड पूर्णपणे स्वच्छ होते. ज्या अधिकाऱ्यांनी माझ्यासोबत काम केले, जे व्यावसायिक माझ्या संपर्कात आले तसेच ज्या पत्रकारांनी माझ्याशी संवाद साधला त्यांना याची चांगली जाणीव आहे. जर माझ्या बाबतच्या खटल्यांवर तुम्हाला काही विचारायचे असेल तर तु्ही सुप्रीम कोर्टाने काल दिलेला निकाल वाचावा यावरुन तुम्हाला अनेक गोष्टी स्पष्ट होतील.

Post a Comment

Previous Post Next Post