'मी इथे येईन' असं म्हणालो नव्हतो तरी आलो, उद्धव ठाकरेंची टोलेबाजी


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : विरोधी पक्ष आस्तित्वात राहणार नाही. कारण विरोधी पक्षातले माझे मित्रच आहेत. इथं यायला भाग्य असावं लागतं. मी भाग्याने इथं आलोय. 'मी इथे येईन' असं म्हणालो नव्हतो तरी आलो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत टोलेबाजी केली.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावावर ते बोलत होते. तुम्ही मुख्यमंत्री झाल्यांनतर आम्ही विरोधी पक्षात होतो, तुमची आमची युती नव्हती, त्यावेळीही आमचं हिंदुत्व होतं. आजही आहे, कालही होतं, उद्याही ते कायम राहील, पण त्या दिलेला शब्द पाळणं हे हिंदुत्व आहे. जय श्रीराम म्हणायचं आणि दिलेलं वाचन तोडायचं हे माझं हिंदुत्व नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.
मी भाग्यवान आहे, जे विरोधात होते ते मित्रपक्ष झाले, जे मित्रपक्ष होते ते विरोधी पक्षात आले, असेही ते म्हणाले. यावेळी ठाकरे म्हणाले की, आपला परिचय आधी हाती आला असता तर बरं झालं असतं. आमच्याकडे बंद दाराआड आणि कानात काय बोललो हे सांगण्याची पद्धत नाही. आमची तशी संस्कृती नाही. अनेक वर्ष आपण सोबत आहोत. सभागृहात लावलेल्या महापुरुषांच्या तसविरींकडून आपण प्रेरणा घ्यायची. त्या फक्त प्रतिमा नाहीत तर ते विचार आहेत, असे ठाकरे म्हणाले. इथं यायला भाग्य असावं लागतं. मी भाग्याने इथं आलोय. मी इथं येईन असं मी कधीही बोललो नव्हतो, तरीही मी इथं आलो. आपण नवीन काहीतरी करू, असे ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी विरोधकांनी केली. तो कोरा करायचाच आहे. सातबारा कोरा केला नाही तर आपण जनतेचे गुन्हेगार ठरू. मला शेतकऱ्याला चिंतामुक्त करायचं आहे. सगळे दिग्गज सोबत आहेत. सगळं काम पूर्ण करू, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, देवेंद्रजी तुमची माझी मैत्री आहे. देवेंद्रजी आम्ही तुमच्यासारख्या मित्रांकडून मी खूप काही शिकलेलो आहोत. तुमची आणि माझी मैत्री आम्ही कुठेही लपवलेली नाही. तुमची माझी मैत्री आहे आणि त्यात कधीही अंतर येणार नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळी माझा एक मित्र मुख्यमंत्री झालाय याचा आम्हाला आनंद झाला. गेल्या पाच वर्षात आम्ही एकदाही दगा देण्याचा प्रयत्न केला नाही. तुमच्या कुठल्याही कामाच्या आड आम्ही आलो नाही. माझी माझ्या सगळ्या सदस्यांना सक्त ताकीद होती की कपट कारस्थान करायचं नाही, काळोखात काही करायचं नाही, मध्यरात्रीची खलबतं करायची नाही, माझा मित्र समोर विरोधी पक्षात बसला आहे. तुम्ही सोबत असता तर आज मी हा कारभार घरी बसून टीव्हीवर पाहिला असता,असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post