हिंदू असणं पाप आहे का? नितीन गडकरींचा सवाल


एएमसी मिरर वेब टीम 
नागपूर : हिंदू असणं पाप आहे का? पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानात १९४७ मध्ये हिंदुंची संख्या किती होती? पाकिस्तानात २२ टक्के लोकसंख्या हिंदूंची होती, जी आज केवळ तीन टक्क्यांवर आली आहे. मग उर्वरीत १९ टक्के हिंदू गेले कुठं? अनेकांचे बळजबरी धर्मांतर करण्यात आले. महिलांवर अत्याचार झाले. पाकिस्तानात नागरिकांचे कोणत्याही प्रकारे संरक्षण केले गेले नसल्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. नागपूर येथे आज सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला ते मार्गदर्शन करत होते.


यावेळी गडकरी म्हणाले की, महात्मा गांधी यांनी त्या नागरिकांना आश्वासन दिले होते, तुम्हाला ज्या दिवशी असुरक्षित असल्याचे वाटेल, तेव्हा तुम्ही चिंता करू नका, भारत तुम्हाला आधार देईल, असे महात्मा गांधी यांच्यासह पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभाई पटेल यांनी सांगितले होते. त्याच निर्वासितांना ७० वर्षांनंतर आमच्या सरकारने भारताचे नागरिकत्व प्रदान केले, मग आम्ही काय चुकीचे केले? असा प्रश्न गडकरी यांनी यावेळी उपस्थित केला.
सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरोधात देशभरात एकीकडे ठिकठिकाणी निदर्शने केली जात असताना, दुसरीकडे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात आज सकाळी लोका अधिकार मंचच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांसह विविध संघटना व नागरिकांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले.
यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी या कायद्याच्या समर्थनात मोठ्याप्रमाणावर घोषणाबाजी केली. शिवाय हा कायदा कोणाच्याही विरोधात नाही तर देशाहितासाठी असल्याच्याही प्रतिक्रिया देण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये या कायद्याबद्दल विरोध प्रदर्शन करण्यात आले होते.
सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) बद्दल जनजागृती करण्यासाठी भाजपाकडून आता विशेष दहा दिवसीय अभियान राबवले जाणार आहे. देशभर चालवल्या जाणाऱ्या अभियानातंर्गत तीन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांशी संपर्क साधला जाणार आहे. भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी याबाबत शनिवारी माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसकडून सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post