उन्नाव बलात्कार पीडितेचा सफदरगंज रुग्णालयात मृत्यू


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : उन्नाव येथील बलात्कार पीडितेचा शुक्रवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. बलात्कार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींनी जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ती ९० टक्क्य़ांहून अधिक भाजल्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री ११.४० च्या सुमारास सफदरजंग रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. कार्डिॲक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. यापूर्वी तिला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते.

तिच्यावर गेल्यावर्षी बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकाला दहा दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी फरार आहे. गुरुवारी सकाळी पाच जणांनी तिच्यावर हल्ला करून तिला पेटवून दिले होते. नंतर तिला जखमी अवस्थेत लखनौ येथे आणि नंतर तेथून दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्ली वाहतूक पोलिसांनी तिला विमानतळावरून तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी विनाअडथळा हरित मार्गिका उपलब्ध करून दिली होती.
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, एकूण सहा जणांनी मिळून तिच्यावर हल्ला केला होता. यावेळी तिच्या डोक्यावर आणि गळ्यावर चाकूने वार करण्यात आले. पीडित महिला जमिनीवर पडली असता तिच्यावर केरोसिन टाकून जाळण्यात आलं. यावेळी काही जणांनी पीडितेची मदत करण्यासाठी धाव घेतली. मात्र आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. स्थानिकांनी फोन करुन या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.


Post a Comment

Previous Post Next Post