एएमसी मिरर वेब टीम
कोलकाता : बरं वाटत नसल्याने चेक अपसाठी या अशी विनंती एका महिलेने डॉक्टरांना केली. डॉक्टर घरी गेल्यावर त्यांचे कपडे उतरवण्यात आले. त्या डॉक्टरचे फोटो काढण्यात आले आणि त्या बदल्यात १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकाराने डॉक्टरही चक्रावून गेला. कोलकाता या ठिकाणी ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. कोलकाता या ठिकाणी असलेल्या डमडम भागातून या डॉक्टरांना फोन आला. एका महिलेने हा फोन केला होता. ” माझ्या छातीत वेदना होत आहेत मला तपासण्यासाठी घरी या” अशी विनंती या महिलेने केली होती. असं या डॉक्टरने सांगितलं
महिलेने केलेल्या या कळकळीच्या विनंतीनंतर हा डॉक्टर महिलेच्या घरी पोहचला. या महिलेला आधी काय औषधं दिली आहेत हे डॉक्टर तपासत होता. तेवढ्यात या महिलेने काही इशारे केले. त्यानंतर तीन लोक या महिलेच्या घरी आले. त्यांनी बळजबरीने या डॉक्टरला कपडे काढण्यास भाग पाडले. त्यानंतर या महिलेसोबत डॉक्टरचे फोटो काढले आणि १० लाखांची मागणी करु लागले.
”तू जर आम्हाला १० लाख रुपये दिले नाहीस तर आम्ही तुझी बदनामी करु आणि तुझे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करु” अशी धमकीच या डॉक्टरला देण्यात आली. ज्यानंतर या डॉक्टरने विनंती केली की माझ्याकडे आत्ता इतकी रोख रक्कम नाही मला घरी घेऊन चला. त्यानंतर तिघांपैकी दोघेजण डॉक्टरला घेऊन त्याच्या घरी गेले. त्यानंतर या डॉक्टरने ५ लाख १५ हजार रुपये रोख आणि बायकोचे ५ लाखांचे दागिने या दोघांच्या हाती दिले. मात्र हे पैसे देत असतानाच डॉक्टरने मोठ्या शिताफीने पोलिसांनाही घडला प्रकार कळवला.
त्यानंतर पोलिसांनी या चारही जणांना अटक केली. या चौघांच्या घरातून पोलिसांचा एक गणवेशही मिळाला असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. या चारही जणांना कोर्टापुढे हजर करण्यात आलं. कोर्टाने या चौघांना जामीन मंजूर केला आहे. मात्र या प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे असं पोलिसांनी सांगितलं.
Post a Comment