कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी अभिनेत्री मनिषा कोईराला नगरमध्ये


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : कॅन्सरसारखा गंभीर आजार त्यातही स्त्रियांमध्ये आढळणार्‍या कर्करोगांबाबत समाजात जनजागृती व्हावी, या आजाराबाबतचे समज-गैरसमज दूर व्हावेत या उद्देशाने नगर शहरातील मॅककेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर कॅन्सर सोसायटी, आनंदसाई फाऊंडेशनच्या सहयोगातून परिपुर्ण माहिती सामान्य स्त्रियांपर्यंत पोहाचावी या उद्देशाने आशेची पालवी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्करोगाबाबत जनजागृती करणार्‍या अभिनेत्री मनिषा कोईराला या महिलांशी संवाद साधणार आहेत.

डॉ. सतिष सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आशेची पालवी’ या पुस्तिकेचे प्रकाशन अभिनेत्री मनिषा कोईराला यांच्या हस्ते होत आहे. हुंडेकरी शोरुमच्या मागे असलेल्या बंधन लॉन येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होत आहे. मनिषा कोईराला या कर्करोगाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत. त्यांनी स्वतः कर्करोगाबाबत यशस्वी लढा दिलेला आहे. अमेरीकेतील न्यूयॉर्क येथे त्यांनी स्वअनुभवावर लिहिलेल्या कर्करोग जगजागृतीबाबत पुस्तकाचे ‘द हिल्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. कर्करोग जनजागृतीबाबत सध्या त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. मनिषा कोईराला या कर्करोगाबाबत असणारे समज, गैरसमज व संकोच दूर करून कर्करोगाला सोमोरे जावे याबाबत प्रबोधन करणार आहेत. या आजाराशी संघर्ष करतांना त्यांनी स्वतः घेतलेले अनुभव त्या समाजासमोर मांडणार आहेत. यावेळी डॉ. सतिष सोनवणे हे स्वतः कर्करोगासंबंधी मार्गदर्शन करतील. त्याचे निदान कसे करावे, त्यावरील उपचार व त्याबाबत असलेल्या शंकाबाबत महिला वर्गाला मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमासाठी महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन लेडीज विंग, मॅक्सकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर कॅन्सर सोसायटी व आनंद साई मेडीकल फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

भारतात दरवर्षी सुमारे 15 लाख कर्करोग रुग्ण नव्याने आढळून येतात. महिलांमध्ये स्तनांचा, गर्भाशय मुखांच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. आपल्या देशात दर 22 स्त्रियांमागे एका स्त्रीला स्तनांचा कर्करोग होऊ शकतो असा अहवाल वैद्यकीय क्षेत्राने दिला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे या आजाराचे गांभीर्य दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या देशातील महिलांमध्ये अजूनही या आजाराबाबत पुरेशी जनजागृती झालेली नाही. घरातील एखाद्या महिलेला जर या आजाराची लक्षणे दिसू लागली तर त्याबाबतची माहिती देण्यासाठी संबंधित महिला संकोचतात. त्यामुळे तो आजार गंभीर अवस्थेत जाऊन पोहोचतो. विशेष म्हणजे सुशिक्षित कुटुंबातील महिलांनाही या आजाराबाबत पुरेशी माहिती नसते. दुर्दैवाने थेट शेवटच्या स्टेजला या आजाराचे निदान होते. कर्करोगाबाबतची माहिती, त्याची लक्षणे याबाबतचे प्रबोधन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. प्रशांत पटारे, डॉ. आनंद काशीद, डॉ. मोहम्मद माजीद, डॉ. सुदाम जरे, डॉ. अभिजीत शिंदे, डॉ. पंकज वंजारे, डॉ. निलेश परजणे, डॉ. सुशील नेमाने, उद्योजक योगेश मालपाणी, निनाद शिंदे, सीए अभय भंडारी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post