अहमदनगर : ट्रकने महिलेस चिरडले; संतप्त नागरिकांचे रास्तारोको आंदोलन


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : रस्त्याच्या कडेला रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या वृद्धेस लिंक रोडकडून नगरकडे येणार्‍या मालट्रकने चिरडले. या अपघातात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.10) दुपारी 12 ते 12.30 च्या दरम्यान नगर-पुणे रोडवरील भूषणनगर येथे हॉटेल रंगोली जवळ घडली.

शांताबाई ताराचंद काळे (वय 65, रा.निमगाव वाघा, ता.नगर) या नगरकडे जाण्याकरीता भूषणनगर येथील रंगोली हॉटेल जवळील रस्त्याच्या कडेला रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळेस लिंक रोडने नगरकडे भरधाव वेगात येणार्‍या मालट्रक (क्र.एम.एच.16, ए.ई.5797) चा धक्का लागून शांताबाई काळे या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच घटनास्थळावरील नागरिक मदतीकरीता धावले. नागरिकांनी ट्रक चालक सय्यद (पूर्ण नाव माहित नाही रा.बीड) याला पकडून कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. संतप्त नागरिकांनी यावेळी ट्रकच्या काचा फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक विजू पठारे, माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांच्यासह रमेश परताने, राजू पठारे, राजू सातपुते, भरत गारुडकर हे घटनास्थळी पोहोचले. या घटनेची माहिती कोतवाली पोलीस ठाण्यास देण्यात आली. अपघात हाताच पुणे महामार्गावर दुतर्फा वाहतूक ठप्प झाली. संतप्त नागरिकांनी दिवसा शहरातून येणार्‍या अवजड वाहनांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. दिवसा शहरातून अवजड वाहने जाण्यास बंदी असताना अवजड वाहने शहरात प्रवेश करतातच कशी? असा प्रश्‍न उपस्थित करुन केडगाव बायपास चौकात तसेच कल्याण बायपास चौक व भूषणनगर चौक येथे कायम स्वरुपी पोलीस कर्मचारी नेमावेत, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरीता प्रयत्न केले व रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, मयत शांताबाई काळे यांच्या नातेवाईकांनी अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रक चालकास ताब्यात द्या अन्यथा मृतदेह हलविणार नाही अशी भूमीका घेतली. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी परिस्थिती योग्यरित्या हाताळून मृतदेह शवविच्छेदनाकरीता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. अपघाताच्यावेळी ट्रक चालक हा ट्रक चालू असताना मोबाईलवर बोलत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शिंनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post