स्वच्छतेबाबत नागरिकांनी प्रतिक्रिया नोंदवाव्यात; नाट्य, चित्रपट व सांस्कृतिक क्षेत्रातील संघटनांचे आवाहन


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत शहरात केंद्र शासनाच्या पथकाकडून तपासणी सुरू आहे. पथकातील अधिकारी नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. मात्र, आता मोबाईल अ‍ॅपवरुन स्वच्छतेबाबत थेट प्रतिक्रिया नोंदविण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ‘एसएस2020 वोट फॉर युअर सिटी’ हे नवे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, नागरिकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवाव्यात किंवा स्वच्छ सर्वेक्षणच्या संकेतस्थळावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात, असे आवाहन शहरातील नाट्य, चित्रपट व सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थांनी नागरिकांना केले आहे.

केंद्र शासनाच्या पथकाकडून सर्वेक्षणांतर्गत शहरातील स्वच्छतेची तपासणी करतांनाच नागरिकांशी संवाद साधला जात आहे. मंगळवारपर्यंत पथकाकडून शहरात तपासणी होणार आहे. मात्र, नागरिकांना थेट प्रतिक्रिया नोंदविता यावी, यासाठी शासनाने स्वतंत्र मोबाईल अ‍ॅपची निर्मिती केली आहे. ‘एसएस2020 वोट फॉर युअर सिटी’ या अ‍ॅपवर नागरिकाचे नाव व मोबाईल क्रमांक टाकून प्रश्नांची उत्तरे देता येणार आहेत. तशीच सुविधा संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. अधिकाधिक प्रतिक्रिया नोंदविल्या जाव्यात यासाठी, विविध संस्था, संघटना आता पुढाकार घेत आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, नाट्य परिषद, अहमदनगर फिल्म फाउंडेशन, रसिक ग्रुप, बालरंगभूमी परीषद, जिप्सी प्रतिष्ठान, रंगकर्मी प्रतिष्ठान, रंगोदय प्रतिष्ठान आदी संघटनांनी नुकतीच बैठक घेतली. नागरिकांनी ‘प्ले स्टोअर’मधून अ‍ॅप डाऊनलोड करावे व आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यासाठी सतीश लोटके, जयंत येलूलकर, प्रकाश धोत्रे, सतीश शिंगटे, पी.डी. कुलकर्णी, श्रेणीक शिंगवी, दत्ता पवार, सौ.उर्मिला लोटके, विराज मुनोत, रितेश साळुंके, क्षितिज झावरे, सागर मेहेत्रे, अशोक अकोलकर, अनंत रिसे, उद्धव काळापहाड, सागर खिस्ती, श्रीकांत गरगडे, संजय आढाव, सारंग देशपांडे, रवी त्रिभुवन, बाळकृष्ण जगताप, प्रशांत जठार, स्वप्नील नजान यांनी नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.

आपल्या शहराच्या नावलौकिकात भर पडावी, यासाठी कलाकार सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून, नागरिकांनी या मोहिमेस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे जिल्हा समन्वयक शशिकांत नजान आणि नाट्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष अमोल खोले यांनी केले आहे.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून स्वच्छतेबाबत व नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. घंटागाडीची माहिती मोबाईलवर उपलब्ध व्हावी, यासाठी मनपाने मोबाईल अ‍ॅप कार्यान्वित केलेले आहे. शहरात स्वच्छतेसाठी मनपाचे सर्व अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. स्वच्छतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आठ पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. सर्वेक्षणात देशातील पहिल्या 100 स्वच्छ शहरांमध्ये नगरचा समावेश व्हावा व ‘थ्री स्टार’ मानांकन मिळावे, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

मोबाईल अ‍ॅपवर कशी नोंदविणार प्रतिक्रिया?
प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी शासनाने ‘एसएस2020 वोट फॉर युअर सिटी’ हे अ‍ॅप ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध केले आहे. नागरिकांनी आधी हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर आपली भाषा निवडावी. भाषा निवडल्यानंतर राज्य, जिल्हा व शहराचे नाव आदी माहिती भरावी. त्यानंतर नागरिकाचे वय व रहिवासी असल्याबाबत माहिती भरावी. त्यानंतर नागरिकाला मोबाईलमधील जीपीएस-लोकेशन ऑन करावे लागेल. त्यानंतर स्वतःचे नाव, मोबाईल क्रमांक व लिंग आदीची माहिती भरावी. त्यानंतर मोबाईलवर आलेला ‘ओटीपी’ क्रमांक टाकल्यावर प्रश्नांची उत्तरे देऊन आपल्या प्रतिक्रिया नोंदविता येणार आहेत.

मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

संकेतस्थळावर प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी क्लिक करा

Post a Comment

Previous Post Next Post