राजकीय नेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका: 'स्वीकृत'च्या शिफारसी नाकारल्या


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिवसेना, भाजपा, आणि राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांच्या गटनेत्यांनी सूचविलेले पाचही उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नकार दिला आहे. छाननीनंतर कागदपत्रे अपूर्ण असाल्यामुळे शिफारसी न केल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, राजकीय नेत्यांसाठी हां मोठा धक्का मानला जात आहे.

महापालिकेचे नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्य निवडीसाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शुक्रवारी (दि.10) सकाळी 11 वाजता महापालिकेची विशेष सभा बोलावली होती. सभा सुरु झाल्यावर महापौर वाकळे यांनी शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी सुचविलेली संग्राम शेळके व मदन आढाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संपत बारस्कर यांनी सुचविलेली बाबासाहेब गाडळकर व विपुल शेटीया आणि भाजपच्या गटनेत्या सौ. मालन ढोणे यांनी सुचविलेले उमेदवार रामदास आंधळे यांची नावे घोषित केली. मात्र त्याचवेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या सर्व उमेदवारांच्या शिफारसी नाकारल्या असल्याचे त्यांनी जाहिर केले.

महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्याबळानुसार शिवसेनेला व राष्ट्रवादीला प्रत्येकी 2 स्वीकृत नगरसेवक तर भाजपला एक असे नगरसेवक नियुक्त करता येणार आहेत. तीनही पक्षांच्या गटनेत्यांनी स्वतंत्र पाकिटांद्वारे आपल्या स्वीकृत सदस्यांची नावे गुरुवारी (दि.9) सायंकाळी महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त- जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे दिली होती. त्या अर्जांची छाननी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केली असता त्यांना यातील एकही जण पात्रतेच्या निकषात बसत नसल्याचे आढळून आले.

स्वीकृत नगरसेवक निवडीसाठीचे निकष
महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी कायद्यातील तरतुदीनुसार एकूण 8 निकष आहेत. त्यामध्ये मान्यताप्राप्त व नोंदणीकृत वैद्यक व्यावसायी म्हणून किमान 5 वर्षे काम केलेली व्यक्ती, किमान 5 वर्षे शिक्षण तज्ज्ञ म्हणून काम करताना निवृत्त प्राध्यापक, व्याख्याता व मुख्याध्यापक म्हणून काम केलेली व्यक्ती, सनदी लेखापाल वा परिव्यय लेखापाल म्हणून कमीत कमी 5 वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती, कमीत कमी पाच वर्षांचा व्यावसायिक अनुभव असलेली व मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवीधारक व्यक्ती, कमीत कमी 5 वर्षांचा अनुभव असलेली कायद्याची पदवीधारक वा विधी क्षेत्रात काम करणारी व्यक्ती आणि महापालिकेचा सहायक आयुक्त वा उपायुक्त म्हणून काम केल्याचा पाच वर्षांचा वा महापालिका आयुक्त म्हणून 2 वर्षे काम केल्याचा अनुभव असलेली व्यक्ती, ’एखाद्या व्यक्तीकडे पालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान अथवा अनुभव असेल, ती व्यक्ती नामनिर्देशित पालिका सदस्याच्या पदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित केली जाण्यास पात्र असेल, याशिवाय, ’महापालिका क्षेत्रात कार्यरत असणार्‍या आणि समाजकल्याण कार्यामध्ये गुंतलेल्या मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम, 1950 खाली नोंदणीकृत समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेचा पदाधिकारी म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती’ असे एकूण 8 निकष आहेत. याशिवाय स्वीकृत नगरसेवक होऊ इच्छिणार्‍यांकडे महापालिकेची कोणतीही व कसल्याही प्रकारची थकबाकी नसणे आवश्यक आहे. यापैकी यावरील सहा निकषांत बसणारे अनेकजण नगरमध्ये आहेत. पण स्वीकृत नगरसेवक निवडीत त्यांचा याआधीही कधी विचार झाला नाही व यावेळीही झाला नाही. अन्य सहा निकष राजकीय पक्षांकडून दुर्लक्षित केले गेले. आणि नोंदणीकृत समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेचा पदाधिकारी या निकषावरच शिफारशी केल्या.


स्वीकृत निवडीसाठी पुन्हा प्रक्रिया राबविणार
जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी स्वीकृतसाठीचे पाचही अर्ज अपात्र ठरविल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुदत देण्याची मागणी सभागृहात नगरसेवकांनी केली. मात्र कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठीची मुदत गुरुवारी (दि.9) सायंकाळपर्यंत होती असे सांगत मुदतवाढ देण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी पुन्हा नव्याने प्रक्रिया राबविण्यात येईल, असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जाहीर केले.
जल्लोषासाठी आलेले कार्यकर्ते हिरमुसले

महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी ज्यांची निवड होणार होती, त्यांना याची पूर्वकल्पना असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचा लवाजमा, ढोल-ताशे, गुलाल, फटाके घेवून महापालिकेच्या आवारात आलेला होता. मात्र सभागृहात जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सर्वांचेच अर्ज अपात्र घोषित केल्याने या निवडींची घोषणा होवू शकली नाही, त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच हिरमुसले. त्यांनी आणलेले गुलाल, फटाके तसेच ठेवून द्यावे लागले. ढोल-ताशांचा गजर करण्यासाठी आणलेल्या व्यक्तींना तेथून गुपचूप जाण्यास सांगावे लागले. महापालिकेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post