#स्वच्छ नगर, सुंदर नगर : मनपा कर्मचाऱ्यांसह नगरसेवकही उतरले रस्त्यावर!


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत मोबाईल अ‍ॅपवरुन स्वच्छतेबाबत थेट प्रतिक्रिया नोंदविण्याची सुविधा नगरकरांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ‘एसएस2020 वोट फॉर युअर सिटी’ हे नवे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, नागरिकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवाव्यात किंवा स्वच्छ सर्वेक्षणच्या संकेतस्थळावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात, यासाठी आता नगरसेवक रस्त्यावर उतरून प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत आहे. प्रभाग एकमधील नगरसेवक संपत बारस्कर, सागर बोरुडे व शिवाजी चव्हाण यांनी हा उपक्रम राबविला आहे.

केंद्र शासनाच्या पथकाकडून सर्वेक्षणांतर्गत शहरातील स्वच्छतेची तपासणी करतांनाच नागरिकांशी संवाद साधला जात आहे. मंगळवारपर्यंत पथकाकडून शहरात तपासणी होणार आहे. मात्र, नागरिकांना थेट प्रतिक्रिया नोंदविता यावी, यासाठी शासनाने स्वतंत्र मोबाईल अ‍ॅपची निर्मिती केली आहे. ‘एसएस2020 वोट फॉर युअर सिटी’ या अ‍ॅपवर नागरिकाचे नाव व मोबाईल क्रमांक टाकून प्रश्नांची उत्तरे देता येणार आहेत. तशीच सुविधा संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. अधिकाधिक प्रतिक्रिया नोंदविल्या जाव्यात यासाठी, मनपाने प्रयत्न सुरू केले आहेत. कर्मचारी, अधिकार्‍यांना प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी नागरिकांशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रभाग एक मधील नगरसेवकांनी मनपा कर्मचाऱ्यांसमवेत रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी ‘प्ले स्टोअर’मधून अ‍ॅप डाऊनलोड करावे व आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात, असे आवाहन नगरसेवक बारस्कर, बोरुडे व चव्हाण नागरिकांना करीत आहे.

मोबाईल अ‍ॅपवर कशी नोंदविणार प्रतिक्रिया?
प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी शासनाने ‘एसएस2020 वोट फॉर युअर सिटी’ हे अ‍ॅप ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध केले आहे. नागरिकांनी आधी हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर आपली भाषा निवडावी. भाषा निवडल्यानंतर राज्य, जिल्हा व शहराचे नाव आदी माहिती भरावी. त्यानंतर नागरिकाचे वय व रहिवासी असल्याबाबत माहिती भरावी. त्यानंतर नागरिकाला मोबाईलमधील जीपीएस-लोकेशन ऑन करावे लागेल. त्यानंतर स्वतःचे नाव, मोबाईल क्रमांक व लिंग आदीची माहिती भरावी. त्यानंतर मोबाईलवर आलेला ‘ओटीपी’ क्रमांक टाकल्यावर प्रश्नांची उत्तरे देऊन आपल्या प्रतिक्रिया नोंदविता येणार आहेत.

मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

संकेतस्थळावर प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी क्लिक करा

Post a Comment

Previous Post Next Post