अहमदनगर : अपहरणप्रकरणी जिल्हा बँकेच्या संचालकासह आठ जणांविरोधात गुन्‍हा


एएमसी मिरर वेब टीम 
श्रीगोंदा : कोथुळ सहकारी सेवा संस्थेचे सचिव राजेंद्र खोलम यांचे अपहरण केल्याप्रकरणी आठ जाणांविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात अला आहे. बेलवंडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ॲसिड हल्ला करून राजेंद्र खोलम यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांचे अपहरण केल्याप्रकरणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार बन्सीलाल नहाटा, कल्याण बाबासाहेब शिंदे, धनंजय सुधाकर लाटे विजय पाटोळे, महेश पानसरे, बाजीराव कळमकर, अमोल लाटे या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र खोलम यांनी फिर्यादीमध्‍ये म्‍हटले आहे की, ११ जानेवारी रोजी सकाळी मी घरी असताना कल्याण शिंदे हा घरी आला. त्याने बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांनी बोलाविले असल्याचे सांगत मला घेऊन गेले. काही अंतरावर एमएच १६ - ६६६६ या गाडीत दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाहटा, अमोल लाटे, धनंजय लाटे गाडीत बसले होते. त्यांनी कोथुळ सेवा संस्थेच्या चार्ज का आणला, उद्याच्या बैठकीत जिल्हा बँकेचा ठराव झाला तर तुझ्यावर ॲसिड हल्ला करू नाही तर तुला गाडीखाली घालून मारून टाकू, असा दम देत बळजबरीने पुणे येथील कृषी विद्यापीठात नेले. तिथे रात्रभर एका खोलीत डांबून ठेवले. परतीच्या प्रवासात माझ्याकडून बळजबरीने कोथुळ सेवा संस्थेच्या सचिव पदाचा राजीनामा लिहून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावरून आठ जणांविरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post