जिल्हा परिषद : सभापतीपदी उमेश परहर, सुनिल गडाख, काशिनाथ दाते, मीरा शेटे


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतीपदी उमेश परहर, महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मीरा शेटे तर बांधकाम आणि कृषी या विषय समित्यांच्या सभापतीपदी काशिनाथ दाते आणि सुनिल गडाख यांची बिनविरोध निवड झाली आहे. दाते आणि गडाख यांना समिती वाटपाचे अधिकार अध्यक्षा राजश्री घुले यांना असून कोणती समिती कोणाला हे अध्यक्षा ठरविणार आहे.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी विषय समिती सभापतीपदाच्या निवडीसाठी विशेष सभा झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत एकूण 14 अर्ज दाखल झाले होते. समाजकल्याण समितीसाठी उमेश परहर, सोमिनाथ पाचारणे यांनी तर महिला बालकल्याण समितीसाठी मीरा शेटे, पंचशीला गिरमकर, सुषमा दराडे, राणी लंके यांनी अर्ज दाखल केले होते. विषय समित्या म्हणजे बांधकाम तसेच कृषी समित्यांसाठी सुनील गडाख काशिनाथ दाते, जालिंदर वाकचौरे, रामहरी कातोरे, अनिल कराळे, शरद झोडगे, शरद नवले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध होण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले गेले. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असल्याने निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते. आघाडीने समाजकल्याण समितीसाठी उमेश परहर, महिला बालकल्याण समितीसाठी मीरा शेटे तसेच अन्य विषय समित्यांसाठी काशिनाथ दाते आणि सुनिल गडाख यांची नावे निश्‍चित केली. त्यानंतर दुपारी निवडीवेळी उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या इतर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले. नियुक्त सभापतींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post