..तर राज ठाकरेंसोबत युती करु शकतो : देवेंद्र फडणवीस


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
सध्या राज्याच्या राजकारणात एका नव्या समीकरणाची चर्चा सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपासोबत युती करण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेटही झाल्याचं वृत्त आहे. दुसरीकडे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही राज ठाकरे भाजपासोबत जाऊ शकतात असे संकेत दिले होते. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना आपली भेटच झाली नसल्याचा दावा केला आहे. मात्र यावेळी त्यांनी भविष्यात मनसे आणि भाजपा एकत्र येऊ शकते, असे संकेतही दिले आहेत. लोकमतच्या सरपंच पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

राज ठाकरेंसोबत बैठक झाली का असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या भेटी अनेक वेळा झाल्या आहेत असं सांगत उत्तर देणं टाळलं. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, मनसे आणि भाजपा एकत्र येण्याचं कोणतीही चिन्ह नाही. त्यांच्या आणि आमच्या विचारात अतंर आहे. आणि जोपर्यंत विचार आणि कार्यपद्धतीत अंतर आहे तोपर्यंत आम्ही एकत्र येऊ शकत नाही. त्यांचे विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात विचार करु शकतो.

आज तरी सध्या अशी कोणतीच शक्यता नाही. आमचा व्यापक दृष्टीकोन आहे. राष्ट्रीय पक्ष असल्याने सर्व घटकपक्षांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे. त्यामुळे आज तरी अशी परिस्थिती दिसत नाही. भविष्यात ते व्यापक विचाराने चालणार असतील तर त्यावेळी विचार केला जाईल, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

सगळ्यात मोठा पक्ष आम्हीच ठरलो आहोत : देवेंद्र फडणवीस
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विश्लेषण करण्याआधी मला आत्मचिंतन करावं लागेल असं म्हटलं. नागपूर जिल्हा परिषद अनेक वर्ष आमच्याकडे होती. कधी सत्तेत असताना होती तर कधी विरोधी पक्षात असताना होती. मागील वेळी आमच्या २१ जागा आल्या होत्या. शिवसेनेच्या आठ, नऊ जागा आल्या होत्या. आम्ही एकत्रितपणे सत्तेत आलो होतो. यावेळी आम्ही वेगळे लढलो आणि काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढली. आमच्या जागा २१ वरुन १५ वर आल्या. तर शिवसेनेच्या सात जागा कमी झाल्या. एकूण जे राजकीय गणित आहे ते नव्याने तयार झालं आहे. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागेल.

राजकीय गणित बदललं असतानाही सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत सगळ्यात मोठा पक्ष आम्हीच ठरलो. आमच्या १०३ जागा आल्या. त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत सगळ्या जास्ता जागा आमच्या आल्या. पण राजकीय गणित बदललं असल्याने आम्हाला नव्याने तयारी करावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडूक लागल्याने तयारी झाली नव्हती. पण पुढच्या वेळी तयारी करु, असा विश्वास देंवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post