तर पुस्तक मागे घेण्यास तयार : जयभगवान गोयल


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकाचं प्रकाशन करत वाद ओढवून घेणारे जयभगवान गोयल यांनी पक्षाने आदेश दिला तर पुस्तक मागे घेऊ असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज काम करायचे त्याप्रमाणे नरेंद्र मोदी काम करत असल्याने आपण त्यांचा उल्लेख महाराजांच्या नावे केला असल्याचं सांगितलं. तसंच कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असंही ते म्हणाले आहेत.

“गेल्या अनेक वर्षांपासून भारताला कोणीही वाली नव्हता. आपल्या संसदेवर मुंबईत दहशतवादी हल्ला करण्यात आला. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारतावर एकही हल्ला झालेला नाही. पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये घुसून हल्ला केला होता. यावर मोदी सरकारने पाकिस्तानमध्ये घूसून प्रत्युत्तर दिलं,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

“शिवाजी महाराज ज्याप्रमाणे प्रत्येकाची, राज्यातील माता,बहिणींची चिंता करायचे तसंच मोदी देशातील माता, बहिणींच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. आज प्रत्येत महिलेला आपण सक्षम असल्याचं वाटत आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज काम करायचे त्याप्रमाणेच नरेंद्र मोदी काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात भारताचा सन्मान वाढला आहे,” असं ते म्हणाले आहेत. मोदी पंतप्रधान झाल्याने देशाचा सन्मान वाढला आहे असे कौतूक यावेळी त्यांनी केलं.

पुस्तक मागे घेणार का ? अशी विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की, “पुस्तक बाजारात आलं आहे. पक्ष सांगेल त्याप्रमाणे करणार. अनेकजण राम, कृष्ण म्हणत लोकांची तुलना देवाशी करतात. मी काही चुकीचं काम केलेलं नाही. ही माझी भावना आहे”.

Post a Comment

Previous Post Next Post