कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदास थोरातांचा नकार


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दर्शवला असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेऊन थोरात आपला निर्णय कळवणार आहेत, असेही सांगितले जात आहे. बाळासाहेब थोरातांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे.

अहमदनगरमधील संगमनेरचे आमदार असलेल्या बाळासाहेब थोरातांना कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर कोल्हापुरातील कागल मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले आमदार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अहमदनगरचे पालकमंत्रिपद सुपूर्द करण्यात आले आहे.

मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद द्यावे आणि आपल्याऐवजी काँग्रेसमधील सहकाऱ्याला अहमदनगरचे पालकमंत्रिपद द्यावे, अशी विनंती थोरात करणार असल्याचं कॉंग्रेसच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. काँग्रेसच्या बारा मंत्र्यांपैकी 11 मंत्र्यांना पालकमंत्रिपदं मिळाली आहेत, मात्र डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे एकाही जिल्ह्याचे पालकत्व नाही. त्यामुळे अहमदनगरचं पालकमंत्रिपद कदम यांना मिळण्याची चिन्हं आहेत.

विश्वजीत कदम हे माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत. विश्वजीत यंदा सांगलीतील पलुस कडेगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्याकडे सहकार, कृषी, सामाजिक न्याय अशा विभागांचं राज्यमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post