चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी AIR INDIA ची विमाने सज्ज


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : चीनच्या वुहान शहरात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाने बोईंग ७४७ विमान सज्ज ठेवले आहे. चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले असून, आतापर्यंत ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूचा अन्यत्र फैलाव होऊ नये, यासाठी चीनच्या प्रशासनाने संपूर्ण वुहान शहर बंद केले आहे. वुहान हे कोरोना व्हायरसचं मुख्य केंद्र असून, त्या शहरात २५० भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. मृत्यूच्या या दाढेतून त्यांची सुटका करावी, यासाठी आता भारत सरकारने चीन सरकारकडे विनंती केली आहे.

चीनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही सरकारच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहोत असे एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण शोधण्यासाठी रविवारपर्यंत देशभरातील वेगवेगळया विमानतळांवर १३७ विमानांमधून उतरलेल्या २९,७०० प्रवाशांची तपासणी करण्यात आली.

अजूनपर्यंत एकही कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळलेला नाही असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. केरळ आणि महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या १०० संशयित रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

१७ शहरांमध्ये येण्या-जाण्यासाठी बंदी
कोरोना व्हायरसचा जिथे सर्वाधिक प्रभाव आहे, अशा १७ शहरांमध्ये येण्या-जाण्यासाठी बंदी घातली आहे. या शहरांशी कोणीही संपर्क करू नये यासाठी त्या शहरांवर बंदी घालण्यात आली आहे. यातील वुहान नावाच्या शहरात ७०० भारतीय विद्यार्थी शिकतात. हेच शहर कोरोना व्हायरसचे केंद्रबिंदू आहे. या शहरात आतापर्यंत ४६ जणांचा कोरोना व्हायरसमुळे जीव गेला आहे. ७०० विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी सुटीमुळे भारतात आले. मात्र तेथे अद्याप २५० विद्यार्थी अडकलेले आहेत. या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करावी आणि त्यांना भारतात परत येऊ द्यावे, अशी मागणी भारताने चीनच्या परराष्ट्र खात्याकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post