संत नगरटाइम्सचे संपादक निशांत दातीर यांना ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर


एएमसी मिरर वेब टीम
फलटण :
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्‍या 27 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा  संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली. यात नगर येथील संत नगरटाइम्सचे संपादक निशांत दातीर यांना ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे देण्यात येणार्‍या राज्यपातळीवरील 26 व्या प्रतिष्ठित ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण लिमये यांच्या हस्ते पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’सभागृहात संपन्न झाले. त्यावेळी 27 व्या ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा रविंद्र बेडकिहाळ यांनी केली. यावेळी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूणचे कार्याध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे)चे कोकण विभागीय कार्यवाह प्रकाश देशपांडे, देवगड पंचायत समितीचे सभापती सुनील पारकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके, पोंभुर्ले गावचे सरपंच सादीक डोंगरकर, जेष्ठ पत्रकार सुभाष धुमे, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर कासेकर, सुधाकर जांभेकर, शांताराम गुरव यांची उपस्थिती होती.

संस्थेतर्फे जाहीर दर्पण पुरस्कार प्राप्त पत्रकार याप्रमाणे -
 
ज्येष्ठ संपादक पुरस्कार - शिवाजीराव अमृतराव शिर्के (संस्थापक संपादक, साप्ताहिक पवनेचा प्रवाह, पुणे), दर्पण पुरस्कार - ‘कोकण विभाग’ - संतोष कुलकर्णी (प्रतिनिधी, दैनिक सकाळ, देवगड), श्रीमती विनया देशपांडे (ब्युरो चिफ, सीएनएन न्यूज 18, मुंबई),
उत्तर महाराष्ट्र विभाग - निशांत दातीर ( संपादक, निशांत / संत नगर टाईम्स, अहमदनगर ),
पश्‍चिम महाराष्ट्र विभाग - गुरुबाळ माळी (प्रतिनिधी, दैनिक महाराष्ट्र टाईम्स, कोल्हापूर),
मराठवाडा विभाग - दयानंज जडे (संपादक, दैनिक लातूर समाचार, लातूर),
विदर्भ विभाग - अनिल जुगलकिशोरजी अग्रवाल (संपादक, दैनिक मातृभूमी व दैनिक अमरावती मंडळ, अमरावती), ज्येष्ठ पत्रकार श्री.शंकरराव पाटील (कराड)
पुरस्कृत धाडसी पत्रकार ‘दर्पण’ पुरस्कार - राहुल तपासे (प्रतिनिधी, ए.बी.पी. माझा, सातारा),
विशेष दर्पण पुरस्कार - सुभाष भांबुरे (प्रतिनिधी, दैनिक पुण्यनगरी, फलटण), जयपाल पाटील (संपादक, साप्ताहिक रायगडचा युवक, अलिबाग).

दर्पण पुरस्काराचे स्वरुप रोख रु.2,500/-  व सन्मानपत्र, जांभेकर चरित्र, ग्रंथ व माहितीपट सी.डी., शाल, श्रीफळ असे आहे. या सर्व पुरस्कारांचे वितरण बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथीदिनी दिनांक 17 मे 2020 रोजी पोंभुर्ले, ता.देवगड येथील ‘दर्पण’ सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचेही यावेळी बेडकिहाळ यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post